YouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..!

| नवी दिल्ली | युट्युबवर व्हिडिओज् टाकून पैसे कमावता येतात हे आपण ऐकून आहोत. तसेच बरेचसे युट्यूबर चांगले चांगले व्हिडिओज बनवून युट्युबवर टाकून लोकप्रियदेखील झाले आहेत. लोकप्रिय होण्याबरोबरच गुगलतर्फे त्यांना योग्य तो आर्थिक मोबदलाही मिळत असतो. भारतीय युट्युबरची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं. भारतात युट्युबवर व्हिडिओ टाकून भरपूर पैसे कमावणारे खूप चॅनल्स आहेत. परंतु गुगलने आता आपल्या नियमांमध्ये बदल केले असून व्हिडिओ टाकल्यानंतर मिळणाऱ्या मोबदल्यातून गुगल आता कर वसूल करणार आहे.

भारतीय युट्यूबर्सना आता यापुढे आधी सारखे भरपूर पैसे कमवणे शक्य होणार नाही. कारण त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यातून गुगल युएस टॅक्स वजा करून उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणार आहे. एक महिन्याच्या कमाईमधून गुगल जवळपास 15 टक्के रक्कम कर स्वरूपात वसुल करणार आहे.

गुगलने याबाबत सर्व युट्युब चॅनल्सना अधिकृत ई-मेल द्वारे ही माहिती दिली आहे. तसेच पुढील काही आठवड्यांमध्ये कर भरण्याविषयीची माहिती आपल्या विचारली जाईल तेव्हा ती भरावी अशी विनंतीही केली. युट्युब संदर्भातल्या नवीन कर नियमाच्या मेलला जर आपण दुर्लक्षित केलं आणि कर भरण्याविषयीची माहिती गुगलला 31 मे 2021 पर्यंत दिली नाही. तर, आपल्याला मिळणाऱ्या एकुण मोबदल्यातून परस्पर 24 टक्के रक्कम वजा केली जाईल.

जर आपण कराविषयीची माहिती भरली असेल आणि कराच्या फायद्यासाठी आपण पात्र असाल आणि अमेरिकन दर्शकांमार्फत तुम्ही पैसे कमावले असेल तर एकूण मोबदल्याच्या फक्त 15 टक्के रक्कम कर स्वरूपात द्यावी लागेल. अमेरिकन युट्यूबर्सपेक्षा भारतीय युट्यूबर्स आधीच कमी पैसे कमावतात त्यामुळे गुगलच्या या नव्या कर धोरणामुळे भारतीय युट्यूबर्सच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.