अभिमानास्पद : लालबागचा राजाचा यंदा आरोग्य उत्सव..!

| मुंबई | मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरोनाचं संकट असल्याने यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशमूर्तींच्या उंचीवरुन लागणारी चढाओढ टाळत अनेक मंडळांनी मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने थेट गणपती बाप्पाची मूर्ती न बसवण्याचे ठरवले आहे. त्याऐवजी ११ दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवला जाणार आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.  लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८७ वे वर्ष. परंतु गणेशोत्सव मूर्ती स्थापना आणि विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करता “आरोग्य उत्सव” म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. 

सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटात सापडला आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. ‘लालबागच्या राजा’ला होणारी गर्दी लक्षात घेता मंडळाने परंपरेला छेद देत समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. ‘लालबागच्या राजा’ ची ख्याती सर्वदूर पसरली आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून अनेक कलाकार, राजकारणी, क्रिकेटपटू लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. इतकंच नाही तर देशविदेशातून भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. अनेक तास रांगा लावून उभे राहतात. यंदा मात्र हा उत्सव होणार नाही.

याआधी, ‘मुंबईच्या राजा’ची २२ फुटांची मूर्ती रद्द करुन ३ फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय झाला होता. मूर्ती लहान आणून उत्सवाची उंची वाढवण्याचे मंडळाने ठरवले होते. तर ‘परळचा राजा गणेश मंडळा’नेही २३ फुटांऐवजी ३ फुटांची गणेशमूर्ती बसवण्याचे ठरवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *