राजू शेट्टी आमदार होणार..?

| कोल्हापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी हे आता विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझ्याशी चर्चा करताना विधान परिषदेचा प्रस्ताव दिला आहे. याबाबत दोन दिवसात आपण निर्णय घेणार आहोत.

मागच्या लोकसभेला भाजपा व मित्र पक्षांच्या सहकार्याने राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांचे भाजपबरोबर संबंध बिनसले. मग त्यांनी थेट मोदींवर सुद्धा टीका केली. मागची लोकसभा तर त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली. त्यात अपयश आले तरी लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान परिषदेतील एखादी जागा मिळावी, असा आग्रह त्यांचा होता.

पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते नाराज होते. आता राज्यपाल कोट्यातून काही जागा भरल्या जाणार असून यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेली ऑफर सांगत याबाबत स्वाभिमानीच्या कार्यकारणी चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राजू शेट्टी आमदार झाले तर ते राज्यात राहणार असल्याने भविष्यातील धैर्यशील माने यांच्या समोरचा मोठा अडथळा दूर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *