राणेंचा मुनगंटीवारांना टोला.. दिली ‘ ही ‘ आठवण करून..!

| मुंबई | ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जावी हे माझं वैयक्तिक मत आहे. ते राज्यपालां पुढं मी मांडलं. ते मांडताना मी भाजपच्या नेत्यांना विचारायला गेलो नव्हतो. ते वरिष्ठ असतील तर मीही माजी मुख्यमंत्री आहे,’ असा खणखणीत टोला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी भाजपचेच वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना हाणला आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणे यांनी केलेली मागणी हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. भाजपची ती अधिकृत मागणी नाही,’ अशी भूमिका मुनगंटीवारांनी मांडली होती. त्याबद्दल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणेंनी आपले मत मांडले. ‘राष्ट्रपती राजवटीबद्दल पक्षाचं मत काय आहे ते प्रदेशाध्यक्ष मांडतील. मुनगंटीवार नाही..! आणि मी माझं मत मांडलं.  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज अडीच ते तीन हजारांनी वाढतेय. मुंबईत आतापर्यंत हजारच्या वर मृत्यू झालेत. लोकांचे जीव वाचवण्यात हे सरकार अपयशी ठरतंय हे मी राज्यपालांच्या निदर्शनास आणलं आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. परिस्थिती पाहूनच मी ही मागणी केलीय. मुनगंटीवारांनी मृतांचे आकडे पाहावेत आणि मग बोलावं,’ असं राणेंनी म्हणत मुनगंटीवार यांना घराचा आहेर दिला आहे. 

‘राज्यपालांकडं जाताना मी त्याची पूर्वकल्पना प्रदेशाध्यक्षांना व फडणवीसांना दिली होती. मुनगंटीवारांना विचारलं नाही. कुणीही मला काही सांगितलं नाही. भाजपच्या नेत्यांना विचारायला गेलो नव्हतो. ते सीनिअर नेते असतील तर मीही माजी मुख्यमंत्री आहे,’ असं राणे म्हणाले.

दरम्यान या वेळी संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते काय सरकारचे सल्लागार आहेत का?
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायची तर आधी गुजरातमध्ये लावावी लागेल असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राणे यांनी समाचार घेतला. ‘संजय राऊत हे बेताल आहेत. त्यांच्या वक्तव्यावर काही बोलण्याची गरज नाही. ते केंद्र सरकारचे सल्लागार आहेत का? कुठल्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची हे सांगण्याचं काम राऊतांना दिलंय का? केंद्र सरकार ते ठरवेल. राष्ट्रपती राजवटीला ते एवढे का घाबरतात?,’ असा सवालही त्यांनी केला. तसेच बाळासाहेब थोरातांचा अभ्यास किती आहे, हेही मला माहित आहे, असा टोला त्यांनी त्यांना देखील लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *