वाचा : बापाने मुलाच्या मुख्याध्यापकांना लिहलेले वाचनीय पत्र..

| मुंबई / संकलित | अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष आणि उत्तम विचारवंत अब्राहम लिंकन यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. अब्राहम लिंकन यांचे विचार आजच्या आधुनिक युगातही लागू होतात. अब्राहम लिंकन यांची बरीच पत्र प्रसिद्ध आहेत, मात्र त्यांनी आपल्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेले पत्र प्रत्येक बाप-लेकानं वाचावं असं आहे.

अब्राहम लिंकन हे उत्तम कार्यकर्ते, विचारवंत, नेते होतेच, पण त्याचबरोबर एक चांगले वडीलही होते. अब्राहम लिंकन यांनी आपल्या मुलाच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याच्या हेडमास्तरांना एक पत्र लिहिले होते. हे पत्र आजही बऱ्याच जणांना माहित नाही आहे. या पत्रामध्ये लिंकन यांनी आपल्या मुलानं कसं असावं, याचबरोबर त्यानं काय शिकावं याबाबत लिहिले आहे.

अब्राहम लिंकन यांनी हेडमास्तरांना लिहिलेले पत्र…

प्रिय गुरुजी,

सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, सगळीच सत्यनिष्ठही नसतात, हे सगळं माझा मुलगा शिकेलच कधी ना कधी. पण त्याला हे शिकवा की, या जगात फसवी माणसं आहेत, साधुचरित पुरुषोत्तमही आहेत आणि स्वार्थी राजकारणीही आहेत. तसेच, अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही आहेत, टपलेले वैरी तसेच जपणारे मित्रही आहेत.

मला ठावूक आहे, सगळ्या गोष्टी काही झटपट शिकता येत नाही. पण जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, की घाम गाळून कमावलेला एक पैसाही आयत्या मिळालेल्या संपत्तीपेक्षा मौल्यवान असतो. हार कशी स्वीकारावी हेही त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमांन कसा घ्यायचा.

तुम्हाला जमलं तर त्याला द्वेष, मत्सरापासून दूर रहायला शिकवा. आनंद संयमानं व्यक्त करायला शिकवा. त्याला हे ही शिकवा की, गुंडाना भीत जाऊ नको कारण त्यांना नमवणं सोपं आहे. त्याला जमेल तेवढं दाखवत जा. त्याला ग्रंथ भांडाराचं वैभव दाखवा, पण त्याच्या मनाला निवांतपणाही द्या जेणेकरून तो या सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवू शकेल. त्याला पक्षांची भरारी पाहू द्या, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर अनुभवू द्या आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलंही पाहू द्या.

शाळेत त्याला हा धडा शिकवा की, फसवून मिळवलेल्या यशापेक्षा सरळ मार्गानं मिळवलेलं यश हे कायम मोठं असतं. त्याला स्वत:च्या कल्पना, विचार यांच्यावर विश्वास ठेवायला शिकवा, लोकांनी त्याला चूक ठरवलं तरी चालेल. त्याला शिकवा की चांगल्या लोकांशी चांगलं वाग आणि वाईटांना चांगली अद्दल घडव. त्याला हे समजवा की ताकद आणि अक्कल विकून कमाई कर पण कधी आत्मा विकू नकोस. त्याच्या मनावर हे ठसवा की सत्य व न्यायासाठी पाय रोवून लढत राहा. त्याला ममतेने वागवा पण जास्त लाड करू नका

त्याला शिकवा, की कोणाचंही बोलणं ऐकून वागू नकोस. लोकांचं ऐक पण तुला योग्य वाटेल तेच कर. त्याला सांगा की सत्याच्या चाळणीतून सर्व गाळून घे आणि त्यातलं जे योग्य आहे त्याच्याच स्वीकार कर. त्याला सांगत राहा की हसत रहावं दु:ख दाबून आणि त्याला हे ही सांगा की मनमोकळे पणानं हस आणि रडू आलं तर रड, त्याची लाज वाटू देऊ नको. कायम स्वत:वर विश्वास ठेवायला त्याला शिकवा, कारण तरच तो मानवजातीवर आणि देवावर विश्वास ठेवू शकेल.

ही माझी आज्ञा आहे समजा, पण तुम्हाला जमेल तेवढं सगळं करा. तो खूप चांगला मुलगा आहे आणि मुख्य म्हणजे माझा मुलगा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *