वाचा : जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद राजस्थानात..!
महाराष्ट्रात देखील उष्णतेची लाट..!

| नवी दिल्ली | कोरोनाचे वाढते संकट, त्यातच आता भारतात पूर्वेकडे पूर परिस्थिती तर उत्तरेकडे दिल्लीत होरपळवणा-या उन्हाने गेल्या १८ वर्षांचा रेकॉर्ड तोडला. सकाळी-सायंकाळी गर्मी पासून मिळणारी सुटकाही आता दुर्लभ झाली आहे.  राजस्थानमधील चुरू हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. येथे पारा ५० अंशांवर नोंदवला गेला. 

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही उष्णतेने कळस गाठला. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राजस्थानाहून येणा-या उष्ण वा-यामुळे उत्तरेकडे वातावरणात उष्मा वाढला आहे.

उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक भागांमध्ये सध्या आलेली उष्णतेची लाट येत्या २४ तासांपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने बुधवारी सांगितले. दरम्यान, आग्नेय मोसमी वा-यांनी बंगालच्या उपसागरात आणखी पुढे मार्गक्रमण केले आहे.

उत्तर व मध्य भारत सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेत होरपळत असून, काही ठिकाणी तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेले आहे. वायव्य भारत, मध्य भारत आणि पूर्व भारताचे लगतचे भाग यांवर उत्तर-पश्चिम दिशेने वाहणा-या कोरड्या वा-यांमुळे सध्याची उष्णतेच्या लाटेची परिस्थिती येत्या २४ तासांमध्ये कायम राहण्याची मोठी शक्यता आहे. अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची ही परिस्थिती राहील आणि विदर्भ आणि पश्चिम राजस्थान या भागांमध्ये तुरळक ठिकाणी अति तीव्र उष्णतेची लाट येईल, असे हवामान खात्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.