वाचा : नागपंचमी बाबत अती विशेष माहिती..!

श्रावणात येणा-या प्रत्येक सणाचं महत्त्व मानवी जीवनाशी कसं निगडित आहे, याचं बारकाईनं संशोधन केलं तर आपल्याला हे नक्कीच कळेल. श्रावण आला की, सणावारांची नुसती रीघ लागते. सणासुदीला सासरवाशिणीलाही माहेरची ओढ लागते. झिम्मा-फुगडीची लगबग सुरू होते. श्रावण सुरू झाला, पहिल्या चार दिवसांत येणारी नागपंचमी ही श्रावणात येणा-या सणांची चाहूल घेऊन येते. नागपंचमी श्रावणातच प्रथम का येते, ती साजरी का करायची, त्यामागचे पौराणिक संदर्भ कोणते आहेत, हे आज नागपंचमी सणाच्या निमित्ताने जाणून घेऊ या.

मुंबईपासून ३५० कि. मी. अंतरावर वसलेलं बत्तीस शिराळा हे गाव इतर गावांपेक्षा वेगळं गणलं जातं. याचं कारणही तसंच आहे. या गावात नागपंचमी ही मोठय़ा उत्सव स्वरूपात आणि खूप वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. पूर्वजांपासून चालत आलेली ही परंपरा आजही त्याच पद्धतीने सुरू आहे.

नागपंचमी म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर येते एखादी नागमूर्ती. ज्याची आपण गंध, पुष्प, आणि दूध अर्पण करून पूजा करतो. पण हेच चित्र शिराळ्यात मात्र वेगळं दिसतं. नागपंचमीच्या दोन ते तीन दिवस अगोदर गावासभोवतीच्या जंगलात नाग पकडण्यास सुरुवात होते. गावातले सर्व लोक आपापल्या परीनं नाग पकडतात व ते पकडलेले नाग आपल्या घरातल्याच एका मडक्यामध्ये ठेवतात.

नागपंचमीच्या दिवशी वाजत-गाजत ट्रॅक्टर वा ट्रकवरून मिरवणूक काढून हे सर्व नाग अंबाबाईच्या मंदिरासमोर किंवा घराच्या अंगणात खेळवले जातात. सूर्योदय होताच हा खेळ सुरू होतो. या दिवशी नाग देखील कोणाला दंश करत नाहीत. पण जर कोणी या खेळात व्यत्यय आणल्यास किंवा नागाला उगाचच डिवचण्याचा प्रयत्न केल्यास मात्र नाग त्याला दंश करतोच पण गावकरीही शिक्षा देतात.

नागपंचमी श्रावणातच का येते, यालाही पौराणिक संदर्भ आहेत. एका पौराणिक कथेनुसार नागपंचमी श्रावणातच का, याचा संदर्भ आढळतो. भक्त चांगुणेची श्री शिव शंकरावरील श्रद्धा अपार होती, याची साक्ष देणारी ही कथा. राजा श्रीयाळ व चांगुणा हे पती-पत्नी शिवभक्त होते. एके दिवशी कैलासपती महादेव यांच्या मनात चांगुणेची सत्त्वपरीक्षा पाहण्याची इच्छा झाली. त्यानुसार महादेवांनी वैराग्याचा अवतार घेतला आणि चांगुणेच्या घरासमोर ते प्रकटले.

महादेवांच्या कृपाशीर्वादाने चांगुणेला एक पुत्र झाला. त्याचं नाव चिलया. चांगुणेच्या घरातून कोणीही रीत्या हाताने परत जात नव्हते. पण या वैराग्याने तिच्या काळजाचा तुकडा अर्थात तिचं बाळ भोजन म्हणून मागितले. यावर कसलाही विचार न करता तिने आपल्या मुलांचं मस्तक धडावेगळं करून त्या वैराग्यास जेऊ घातले. वैरागीरूपी महादेवांनी तिच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं व त्या दिवसापासून नागपंचमी साजरी करायला सुरुवात झाली, असं मानलं जातं. जो भक्त या दिवशी महादेवांची व सर्पाची मनोभावे पूजा करेल त्याला पुत्र रत्नाची प्राप्ती होईल, असा या कथेचा संदेश आहे.

शिराळ्यामध्ये साज-या केल्या जाणा-या नागपंचमी उत्सवामध्ये ‘जुगमे’ हा प्रकार पाहायला मिळतो. ‘जुगमे’ हा खेळ दोन नागांमध्ये खेळवला जातो. या खेळामध्ये दोन नाग एकमेकांना गुंडाळलेले असतात तर याच खेळामध्ये नागांचं नृत्यदेखील पाहायला मिळतं. या खेळामध्ये ज्या व्यक्तीचा नाग विजयी होईल, त्या नागाच्या मालकाला ग्रामपंचायतीकडून बक्षीस मिळतं.

या खेळातला विजयी नाग पुढील निकषांवर निवडला जातो.

» नाग किती वेळ खेळ खेळला?

» नाग किती वेळ फणा काढून उभा होता?

» नागाने अंगणात किती वेळ प्रदक्षिणा घातली?

» नाग किती उंच व किती रुंद होता? तसंच त्याने किती फुत्कार काढले?

» नागाचे दात काढले असतील तर तो साप बाद केला जातो, असा या स्पर्धेचा नियम असतो.

नागपंचमीच्या उपवासाचं महत्त्व

हिंदू धर्मात प्रत्येक सणावारामागे आपल्या पूर्वजांनी काही वैज्ञानिक तर काही धार्मिक कारणं दडवून ठेवली आहेत. मग नागपंचमीच्या दिवशी उपवास का करायचा, हा प्रश्न उरतोच. आजवर भूतलावर चार युग झाली, ती म्हणजे सत्य युग, द्वापारयुग, त्रेता युग आणि सध्या सुरू असलेलं कलीयुग.

आज जरी आपण कलीयुगात जगत असलो तरी सणउत्सवांच्या निमित्तानं आजही आपण सत्य युगातील प्रथा, रूढी-परंपरांचा अवलंब करत असल्याचे दिसते. आपण नागपंचमीचा उपवास करतो, या मागेही एक छोटी कथा आहे. सत्य युगात सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती.

सत्येश्वर हा तिचा भाऊ श्रावण पंचमीच्या आदल्या दिवशी मृत्यू पावला. त्यामुळे तिने त्या शोकात अन्नाचा एकही कण ग्रहण केला नाही आणि याच प्रसंगामुळे स्त्रिया भावाच्या नावानं हा उपवास करतात. भावाला दीर्घायुष्य लाभो, ऐश्वर्य प्राप्ती होवो व आपला भाऊ प्रत्येक संकटाला समर्थपणे तोंड देवो, यासाठी स्त्रिया हा उपवास करतात.

सर्प आहुती

नवनाथ भक्तिसाराच्या ३९व्या अध्यायात सांगितलेल्या कथेनुसार एकेदिवशी राजा जनमेजयान याच्या पुत्राच्या हातून आस्तिक ऋषींचा तपोभंग झाला. ही वार्ता जनमेजयानला कळताच त्याने त्याचा पुत्र तक्षकला शोधण्यास सुरुवात केली पण तक्षक तिथून निघून इंद्रलोकात पोहोचला असल्यामुळे राजा जनमेजयान याने यज्ञात सर्पाची आहुती देण्यास सुरुवात केली.

या यज्ञात जनमेजयाने असंख्य सर्पाची आहुती दिली आणि जेव्हा त्याला कळलं की, त्याचा मुलगा इंद्रलोकात इंद्राची मदत मागायला गेला आहे. तेव्हा त्याने ‘इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा:’ असं म्हणत आहुती द्यायला सुरुवात केली. तेव्हा त्याने आस्तिक ऋषींनाही हवा तो वर मागा, असं आवाहन केलं. तेव्हा आस्तिक ऋषींनी सर्पयज्ञ आहुती थांबवण्याची मागणी केली. तो दिवस श्रावणातील पंचमीचा होता. यामुळे देखील नागपंचमी श्रावणातल्या पंचमीला साजरी केली जाते.

पंढरपुरात नागपंचमीला पंचमी म्हटलं जातं. इथे साज-या केल्या जाणा-या नागपंचमीचीही एक आगळी कथा आहे.

।। धम्म ऋषी सांगतसे राम कथा पांडवा।।

ही ओवी तुम्ही कधीतरी आपल्या आजीच्या तोंडून ऐकली असेल. पण याचं खरं सार आपण जाणून घेऊ.

भगवान श्रीविष्णूच्या अवतारांमध्ये त्यांच्या सखी ही वेगवेगळ्या होत्या. रुक्मिणी ही देवाची अत्यंत प्रिय सखी. एकेदिवशी सत्यभामेला गर्व झाला की, तिच्या इतके देवाला कोणीच प्रिय नाही.

।। रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा की चला।।

या अभंगाची पहिली ओळच आपल्याला सुचवते की, रुक्मिणी काही कारणास्तव नाराज आहेत. पण याचे खरं कारण अभंगाच्या दुस-या चरणात आहे.

सत्यभामेने श्रीकृष्णाची सुवर्णतुला करण्याचं ठरवलं, तेव्हा रुक्मिणी नाराज झाली आणि दुंडौरी वनात निघून गेली. रुसून गेलेल्या रुक्मिणीची समजूत कोण काढणार, हा प्रश्न देवतांसमोर पडला. तेव्हा श्रीविष्णू सोबत सर्व देवतांनी जाऊन फेर धरला आणि तो दिवस म्हणजे श्रावण पंचमीचा होता. तेव्हापासून आजवर स्त्रिया फेर धरतात, झोपाळ्यावर झोके घेतात, झिम्मा-फुगडी खेळतात. आणि आजही वैष्णव दुंडौरी वनात नागपंचमी साजरी केली जाते.

कालिया मर्दनाची कथा

श्रीकृष्ण गोकुळात जेव्हा सवंगडय़ासमवेत यमुना नदीच्या तीरावर चेंडूफळी खेळत असताना, त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला. तेव्हा सांजवेळी झाली होती आणि यमुनेच्या डोहात श्रीकृष्ण चेंडू शोधण्यास उतरले, पण त्यांचे सवंगडी त्यांना डोहातच सोडून पळून गेले आणि त्यावेळी कृष्णाला कालियानागाने आपल्या विळख्यात घेतले. तेव्हा बालरूपी भगवानांनी त्याला मारून टाकलं आणि तो दिवस म्हणजे श्रावण पंचमी. तेव्हापासूनच कालिया नागाचे मर्दन केल्यामुळे नागपंचमी साजरी केली जाते.

या प्रसंगाचे वर्णन करणारी ही गवळण :

सांज झाली गाई वासरे परत आली।
पहाते मी बाळाची वाट।।
छकुला माझा आला नाही।
होईल काळोख दाट।।
विशाल पाण्याचा यमुनेचा डोह।
तेथे मांडिला चेंडूचा डाव।।
चेंडू फेकता घेतली धाव।
चेंडू पाण्यामध्ये जाई पोरांनी फिरवली पाठ।।
चेंडू शोधण्या बाळ माझा गेला।
कालिया त्यासी आडवा आला।।
बाळाने त्यासी ठार मारिला।
माझ्या बाळाची काढू का दृष्ट।।

पौराणिक संदर्भ

नागपंचमीचा पुराणात, तसंच मिथकं, दंतकथा यामध्ये शिराळ्याच्या संदर्भ पाहायला मिळतो. द्रुमलनारायणापैकी गोरक्ष नाथाचे मंदिर शिराळ्यात आहे.

गोरक्षनाथ जेव्हा काशी, प्रयाग, मथुरा याचे तीर्थाटन करून महाराष्ट्रात आले, त्यावेळी ते दहा दिवस शिराळ्यातील अंबाबाई मंदिरात वास्तव्यास राहिले होते. हा काळ श्रावणातला होता. या दरम्यान गावात शेतीची कामं जोमात सुरू होती. या वेळेसच एका गावक-याच्या हातून एक साप जखमी झाला. या घटनेमुळे त्या शेतक-याला रात्री झोप लागे ना. तो झोपला तरी त्याला सापच दिसायचे. यामुळे तो पुरता हैराण झाला होता. त्याने घडलेली घटना अंबाबाई मंदिरात वास्तव्यास असलेल्या गोरक्षनाथांना सांगितली.

यावर गोरक्षनाथांनी त्याला ‘आजपासून येणा-या पाचव्या दिवशी किमान एक साप पकडून त्याला अंबामातेसमोर खेळायला सोड. जर तू असं केलंस तर यापुढे तुला सर्प कधी ही बाधा करणार नाही व तो तुझ्या रक्षणाला सदैव तत्पर राहील.’ असं सांगितलं.

गोरक्षनाथांच्या म्हणण्याप्रमाणे त्या शेतक-याने तसं केलं व त्यानुसार त्याला लाभ देखील झाला. त्याने हा सर्व प्रकार गावक-यांना सांगितला. पहिल्यांदा कोणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. परंतु काही दिवसांनी लोकांना त्याचं म्हणणं पटलं आणि तेव्हापासूनची ही रूढी आजही शिराळ्यात पाहायला मिळते.

काही जणांचं असं देखील म्हणणं आहे की, एका शेतक-याने अंबाबाईला नवस बोलल्यामुळे ही परंपरा सुरू आहे. आजही शिराळा गावात नागपंचमीच्या दिवशी सूर्यनारायणाची पहिली किरणं अंबाबाई, मारुती व गोरक्षनाथ यांच्या मंदिरांवर पडल्यावरच नागपंचमीच्या खेळाला सुरुवात होते.
– इंगवले महाराज, सातारा

पाचापासून तयार झालेली पंचमी

आपल्या पूर्वजांनी कुठल्याही सणावाराचा मानवी जीवनाशी संबंध जोडलेला आहे. ‘नागपंचमीचा’ ही मानवी जीवनाशी व शरीराशी संबंध आढळतो. पंचमी या शब्दामधील ‘पंच’ म्हणजे पाच तत्त्व आणि ‘मी’ म्हणजे मनुष्य प्राणी. मनुष्याच्या देहात पाच तत्त्वांचा वास आहे. जर एखाद्या तत्त्वाची कमतरता देहात राहिली तर मनुष्य मनुष्यात असून नसल्यासारखा असतो. मुक्ताई सनद याची ग्वाही देते.

।। स्थापिलासे गोळा, सगुणाचा सार।।
।। त्यासी आधार एक असे।।

या वरील ओवीप्रमाणे मनुष्य देहाची निर्मिती झाल्याचे दिसते. शरीरातील पाच तत्त्व म्हणजे अग्नी, आकाश, वायू, जल आणि तेज. या पाच तत्त्वांच्या अधीन असलेला मनुष्यप्राणी म्हणजे ‘मी’. असं सगळं सार असलेली ही पंचमी. ज्ञानदेव पंचकरणात म्हटले आहे,

।। पंचतत्व एकत्र झाले।।
।। मग शरीर जन्मा आले।।

या ओवीतून आपल्याला समजेल की, मनुष्याचा आणि पंचमीचा किती जवळचा संबंध आहे.
– ह.भ.प. नारायण कवळे, शाळगाव

–अमोल उंबरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *