वाचा : आज काय म्हणाले मुख्यमंत्री..?

| मुंबई | राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दुसरीडे विरोधी पक्ष असलेला भाजप आंदोलन करतोय तसेच राज्यपालांकडे तक्रारी करतोय. अशा दुहेरी आव्हानांचा मुख्यमंत्री सध्या सामना करत आहेत. या पार्श्वभुमीवर त्यांनी आज पुन्हा जनतेशी संवाद साधत केंद्राच्या पॅकेज सिस्टिमवर शेलक्या शब्दात टीका केली. तसेच राज्यातील विरोधकांना देखील राजकारण न करण्याचे आवाहन केले. लॉकडाऊन असा शब्द उल्लेख न करता हळूहळू आपण काही गोष्टी सुरु करत जाऊ फक्त तुम्ही सहकार्य करा असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

या मधील महत्वाचा संवाद:

आता कोरोनासोबत जगायचं : आपण हळूहळू आपल्या आयुष्याची गाडी पूर्वपदावर आणत आहोत. मात्र हे करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. लॉकडाऊन अचानक लावणं जसं चुकीचं आहे तसंच लॉकडाऊन अचानक काढणं देखील चूक आहे. आपल्याला आता कोरोनासोबत जगायचं आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, असंही ते म्हणाले.

आकड्यांबाबतआपण अंदाज खोटा ठरवला: राज्यात मे महिन्याच्या अखेरीस सव्वा ते दीड लाख कोरोनाबाधित आढळतील असा अंदाज केंद्राच्या पथकाने नोंदवला होता. मात्र आज राज्यात केवळ ३३६८६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात आजघडीला ४७१९० कोरोनाबाधित आहेत त्यापैकी १३४०४ बरे झाले आहेत. आपण शिस्त दाखवली त्यामुळं आपण अंदाज खोटा ठरवला आहे. आपण शिस्त पाळल्यानेच आपण आकडे आटोक्यात आणले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात साडेतीन लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गुणाकार जीवघेणा होणार:
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आता गुणाकार जीवघेणा होणार आहे, केसेस वाढणार आहेत. त्यामुळं आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आपण कोरोनाविरोधात लढाईसाठी सज्ज आहोत. यापुढची कोरोनाविरोधातील राज्याची लढाई अधिक बिकट होणार आहे. कोरोना रुग्णवाढीचा गुणाकार वाढणार असून तो जीवघेणा होणार आहे. आत्तापर्यंत जशी रुग्णसंख्या वाढली तशीच ती पुढील काळातही वाढणार आहे. पण यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नाही. कारण, यावर मात करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत. मे अखेरीस १४ हजार बेड उपलब्ध होतील, असं देखील त्यांनी सांगितलं. कोरोनासोबत जगायचं आहे हे आपल्याला शिकावं लागणार आहे, असं देखील ते म्हणाले. काहींना अजूनही याचं गांभीर्य कळत नाही. याचा अर्थ काय? ते तुम्हाला समजलं असेल. मास्क सक्तीचा का? हात का धुवायचा? या संदर्भातले बॅनर्स लावले आहेतच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

रक्तदान करण्याचं आवाहन:
यावेळी त्यांनी रक्तदान करण्याचं आवाहन देखील केलं. दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळ रक्तदान करा. आपण साठा पुरेसा असल्यानं थांबवलं होतं. आता पुन्हा गरज निर्माण झाली आहे. रक्तदान करणाऱ्यांनी पुढं यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. आता पावसाळा येईल त्यामुळं इतर साथीच्या रोगांपासून देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे, असं ठाकरे म्हणाले. अंगावर दुखणं काढू नका, लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा. शेवटच्या टप्प्यात आल्यावर किंवा लक्षणं वाढल्यावर अनेकजण येतात. त्यामुळं अनेक मृत्यू झाले आहेत. वेळेवर उपचार मिळाल्याने आणि प्राथमिक आल्यावर जास्तीत जास्त लोकं बरी होत आहेत, असं ते म्हणाले.

इतर महत्वाचे मुद्दे

 • मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या महिलांची बालकं कोरोना निगेटीव्ह आल्याचे वृत्त ऐकून आनंद झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 • आधी आरोग्य सुविधा देतो नंतर पॅकेज देतो. पोकळ घोषणा करणारं हे सरकार नाही असे म्हणत केंद्राच्या ‘पॅकेज’वर त्यांनी टीका केली.
 • राज्याने आतापर्यंत ४८१ ट्रेन सोडल्या. यामध्ये ७ लाखापर्यंत प्रवासी मजुरांची सोय केली. राज्य सरकारने ८५ कोटी रुपये दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रोज ८० ट्रेनची मागणी करतोय पण आपल्याला ३० ते ४० ट्रेन आपल्याला दिल्या जात आहेत.
 • सर्व मजुरांची नीट सोय करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तिकिट घेतलेलं नाही. केंद्राची वाट न बघता राज्याने खर्च केलाय.
 • रस्त्याने मजुर निघाले होते. एसटी ने रस्त्याने जाणाऱ्या लोकांना स्थानकापर्यंत तसेच परराज्यापर्यंत सोडण्यात आले. ५ ते २३ मे पर्यंत एसटीच्या ३२ हजार फेऱ्या झाल्या. यामध्ये एसटीच्या माध्यमातून ३ लाख ८० हजार मजुरांना त्यांच्या स्थानक किंवा घरापर्यंत सोडले. यांच्यासाठी राज्य सरकारने ७५ कोटी खर्च केला आहे. इतर राज्यातल्या मजुरांना आपण जा सांगितलं नाही. त्यांना घरी जायचं होतं. आपण केंद्राकडे परवानगी मागितली पण तेव्हा मिळाली नाही. आता हे संकट वाढल्यानंतर ही परवानगी मिळाली.
 • अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निर्णय देखील व्यवस्थित घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
 • जवळपास५० हजार उद्योग सुरु झाले. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम सुरु झाले आहे. ग्रीन झोनमध्ये जिल्हा अंतर्गत एसटी सेवा सुरु आहे.
 • शेतकऱ्यांला बांधावरच बीबियाणे उपलब्ध करुन दिले जाण्यासंदर्भात विचार सुरु आहे. कापूस खरेदी, दुध उत्पादक, आरोग्याच्या बाबतीतही आपण विचार करतोय असे मुख्यमंत्री म्हणाले.
 • रत्नागिरीत टेस्ट लॅबसाठी परवानगी देण्यात आली आहे.
 • पुढच्या महिन्यात वारी येतेयं वारकऱ्यांसोबत देखील बोलण सुरु आहे.
 • हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे कोणी राजकारण करु नका. तुम्ही केलं तरी आम्ही करणार नाही. केंद्राकडूनही अनेक गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या नाहीत मग मी बोंब मारु का ? असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला. फक्त राजकारण म्हणून राजकारण आम्ही करणार नाही.
 • लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा. हळूहळू काय सुरु करायच याची यादी मी देत जाईन पण तुम्ही सहकार्य करा.

Leave a Reply

Your email address will not be published.