| कल्याण | कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या मुंबईतील शासकीय- खासगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुंबईत ये-जा करण्यावर केडीएमसीने निर्बंध आणले आहेत. येत्या ८ मे शुक्रवारपासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांत कल्याण डोंबिवलीत वास्तव्याला असणाऱ्या मुंबईतील अशा अनेक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या आणि मुंबईत खासगी-शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. सध्या राज्यामध्ये मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनाही लागण झाल्याचे प्रकार वाढू लागले आहेत. कल्याण डोंबिवलीतही कोरोनाने २०० चा आकडा ओलांडला असून मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकडाही वाढत चालला आहे.
त्यामूळे मुंबईत ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध घालण्यासह संबंधित कार्यालयांनीच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी राजकीय, सामाजिक स्तरातून केली जात होती. त्यानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेने मुंबईत कामाला असणाऱ्या शासकीय आणि खासगी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्यास 8 मे पासून मनाई केली आहे. तसेच मुंबईत शासकीय आणि खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था मुंबई महापालिकेमार्फत संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाजवळील हॉटेलमध्ये केली जाणार आहे.
तर मुंबईतील बँका, खासगी कंपनी आणि इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुंबईत राहण्याची आपापली व्यवस्था स्वतःच करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातून मुंबईला कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली सर्व माहिती ई मेलद्वारे केडीएमसीला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
I’m staying at Dombivli East n working in cid br sb1 Mumbai