Result : १२ वी निकालात मुलींची नेहमीप्रमाणे बाजी, कोकण विभाग पुन्हा अव्वल..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकणने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम राखले आहे. कोकण विभागाचा राज्यात सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकणचा निकाल ९५.८९ टक्के इतका लागला आहे. तर राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यात मुलींनी बाजी मारली आहे. आज ऑनलाईन पद्धतीने हा निकाल प्रकाशित करण्यात आला.

यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला असून निकालात मुलींचीच बाजी दिसून येत आहे. मुलींचा निकाल ९३.८८टक्के लागला तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल ८२.६३ टक्के, वाणिज्य शाखा निकाल ९१.२७ टक्के, तर विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के तसेच MCVC चा निकाल ९५.०७ टक्के लागला आहे. दरम्यान, सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के लागला आहे.

ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन स्थलांतर प्रमाणपत्रासाठी मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

गुणपडताळणीसाठी विद्यार्थी १७ ते २७ जुलैपर्यंत, छायाप्रतीसाठी १७ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. त्यासोबत ऑनलाइन पद्धतीने शुल्क (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यु पी आय आणि नेट बँकिंग) याद्वारे भरता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *