सलाम – हे पोलीस अधिकारी राहतात आपल्याच कार्यालयात..!| ठाणे | राज्यात गेले अनेक दिवस वेगवेगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कोव्हिड19 या विळख्यात सापडलेले दिसून आलेले आहेत. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सध्या एकतर उपचार घेत आहेत किंवा त्यांना घरीच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातील वर्तक नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातचं आपला मुक्काम ठेवला आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्य लॉकडाऊन आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या पोलिसांवर सध्या मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. राज्यात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात राज्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कामाचा ताण, कोरोनाची भीती यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधर्य खचण्याची भीती आहे. त्यामुळे ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यातंच मुक्काम ठोकायचे ठरवले आहे.

पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पोलीस ठाण्यात मुक्काम
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड तब्बल वीस दिवसांपासून घरी गेले नाहीत. आपल्या गरजेचे सर्व साहित्य आणि कपडे पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या त्यांच्या केबिनमध्ये आणून ठेवले आहे. या केबिनमध्येच ते राहतात आणि याच केबिनमधून ते काम देखील करतात. केवळ संजय गायकवाडचा नाहीतर त्यांच्यासोबत आणखीन दोन अधिकारी देखील याच पोलीस स्टेशनमध्ये गेले वीस दिवस मुक्काम ठोकून आहेत. वर्तक नगर पोलीस स्टेशन मधील तीन अधिकारी आणि सत्तावीस कर्मचारी आतापर्यंत संशयित म्हणून विलगीकरण त्यांचे करण्यात आलेले आहे. त्यामुळे इतर कर्मचारी हे द्विधा मनस्थिती असताना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचललेल्या पावलामुळे तेदेखील अशा भीषण परिस्थितीत काम करण्यास प्रोत्साहित होत आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पोलीस , डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यात देव दिसतो हे नेहमीच सांगितले आहे आणि त्यात अश्या अधिकाऱ्यांच्या सेवेमुळे ती कल्पना अजून दृढ होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *