सलाम : विक्रम गोखले यांचा असाही दानशूर पणा..!

| मुंबई | सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यात अनेक कलाकार आपले सामाजिक कर्तव्य बजावत आपल्या परीने वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. जसे काही कलावंत आपल्या घराचा वारसा घेऊनच आलेले आहेत मग तो अभिनयातील असो वा दानधमार्चा. विक्रम गोखल्यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले हे दरवर्षी देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्य दलाला मदत म्हणून देत असत.

विक्रम यांनीही वडिलांचा हा वारसा पुढे सुरू ठेवला. त्यांचा हा स्तुत्य वारसा पुढे सुरू ठेवला असून दरवर्षी विक्रम गोखलेही त्यांच्या कमाईतील रक्कम मदत म्हणून देत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कलाकार काही ना काही मदत करीत आहेत. विक्रमजींनी स्वत: मदत तर केलीच शिवाय बॉलीवूड मधील इतर कलावंतानाही हक्काने मराठी चित्रपटसृष्टीतील सहकलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

आतापर्यंत विक्रमजींनी ज्येष्ठ कलावंतांची होणारी फरफट पाहिली आहे. त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा अशी त्यांची कायमच भावना होती. आपली ही मनीषा पूर्ण करण्यासाठी त्यांनी यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा देत ही जबाबदारी पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

यासाठी  विक्रम गोखले यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराची जागा महामंडळाच्या नावाने करून द्यायचा निर्णय घेतला. आज या जागेची बाजार भावानुसार किंमत जवळपास अडीच कोटी रुपये इतकी आहे. या जागेवर ज्येष्ठ व एकटे राहणा-या कलावंतांना आसरा मिळावा म्हणून मोफत राहण्याची सोय करण्याचा निर्णय विक्रम गोखले यांनी घेतला. 

याचसाठी त्यांनी ही पूर्ण जमिन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली. अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा आश्रम उभा करण्याचे ठरवले असून त्यांनी विक्रम गोखले यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *