‘भाजप काड्या घालत आहे..!’ सामनातून खरमरीत टीका..!


मुंबई: ‘महाराष्ट्रात विरोधी पक्ष आकड्यानं ताकदीचा आहे, पण सध्याच्या संकटप्रसंगी विरोधी पक्षाने ही ताकद ‘करोना’विरुद्धच्या लढाईत सरकारबरोबर उभी केली असती तर त्यांची प्रतिष्ठा नक्कीच वाढली असती. मात्र ऊठसूट सरकारवर टीका करायची आणि राजभवनात जाऊन तक्रारीच्या काड्या घालायच्या हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही,’ अशी जोरदार टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. ‘जे कोणी करोना संकटाचे राजकारण करू इच्छितात त्यांचे राजकारण जनताच चुलीत टाकेल,’ असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.

देशांतील काही राज्यांतील राज्यपाल लोकनियुक्त सरकारला डावलून परस्पर प्रशासनाला आदेश देत आहेत. त्यामुळं समन्वयात अडचणी येऊ शकतात, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडंच पंतप्रधान मोदींकडं केली होती. त्याच विषयावर भाष्य करताना शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यातील विरोधी पक्ष भाजपवर तोफ डागण्यात आली आहे.

अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे:

१. करोनाविरुद्धच्या लढ्यात सगळेच मनापासून मैदानात उतरले आहेत. जोखीम घेऊन लढत आहेत. करोनामुळे केंद्र आणि राज्यांमधील पक्षीय मतभेदाच्या भिंती तुटून पडल्या आहेत. जे कोणी कोरोना संकटाचे राजकारण करू इच्छितात त्यांचे राजकारण जनताच चुलीत टाकेल असे सध्या वातावरण आहे.

२. अशा युद्धप्रसंगी निर्णय व सूचनांचे केंद्र एकच असावे, दिल्लीत पंतप्रधान व राज्यात मुख्यमंत्री यांनीच प्रशासनास सूचना द्याव्यात. दुसरे कोणी परस्पर, समांतर सरकार चालवत असेल तर गोंधळाचे वातावरण निर्माण होईल असे पवारांसारख्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्यास वाटत असेल तर ते गांभीर्याने घेतले पाहिजे.

३. आपल्या राज्यपालांना कामाची आवड आहे. ते आज राजभवनात आले असले तरी कालपर्यंत ते संघाचे प्रचारक आणि भाजपचे कार्यकर्तेच होते. त्यामुळे आजही ते कदाचित कार्यकर्त्याच्याच मानसिकतेत असावेत.

४. वेळकाळाचे बंधन न ठेवता काम करणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले आहेत, हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधी सोहळ्यामुळं महाराष्ट्रानं अनुभवलं आहे.

५. महाराष्ट्राचे राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे नेते नाहीत, तर राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत, याचे भान विरोधी पक्षनेत्यांनी ठेवायला हवे. मात्र विरोधी पक्षाची जास्त ऊठबस राजभवनावर सुरू आहे. अर्थात, हीच आपली लोकशाही आहे.

७. राष्ट्रपतींना जसे परस्पर काही करता येत नाही तीच भूमिका राज्यात राज्यपालांची आहे. राज्यपाल मुख्यमंत्र्यांशी एखाद्या विषयावर थेट बोलून आपल्या सूचनांची अंमलबजावणी करून घेऊ शकतात. गरज पडल्यास मुख्य सचिवांना बोलावून चर्चा करू शकतात. पण जिल्हा स्तरावर संपर्क साधून राजभवनातून ‘समांतर’ सूचना जाऊ लागल्या तर कोणीतरी राजभवनाच्या ढालीआडून नसते उद्योग करीत आहे, या शरद पवार यांच्या मनातील शंकेला आधार मिळतो.

८. खरे तर, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्याचे जाहीर कौतुक करावे इतके उत्तम काम सध्या चालले आहे. पंतप्रधान मोदी व त्यांचे सहकारी हे युद्ध जिंकण्याच्या जिद्दीने उतरले आहेत. महाराष्ट्राची त्यांना साथ आहे. या लढ्यात पंतप्रधान मोदींसोबत कोणतेही मतभेद असण्याचा प्रश्नच नाही.

९. आम्ही महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे एक मार्गदर्शक म्हणून पाहतो. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. संसदीय क्षेत्राचा त्यांचा अनुभव आणि व्यासंग मोठा आहे. त्यांच्याही भावना महाराष्ट्राचे राज्यपाल समजून घेतील.


1 Comment

  1. संकट समयी असे घाणेरडे राजकारण कोणीही करू नये.उद्धवजी एका कसलेल्या मार्गदर्शकाप्रमाणे राज्य चालवत आहेत.कोणताही अनुभव पाठीशी नसताना एका देवदुताप्रमाणे कामं करीत आहेत.आताच्या गंभीर परिस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षाने खोडा घालणे बरोबर नाही.आपल्या देशातील, महाराष्ट्रातील लोकं मरत आहेत.त्यामुळे हे एक भयानक संकट आपल्या समोर उभे आहे.तेव्हा आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन संकटावर मात करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *