राज ठाकरेंच्या बंडाला संजय राऊत कारणीभूत – विखे पाटील

| मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून झालेल्या बोचऱ्या टीकेमुळे संतापलेल्या भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. विखे-पाटील यांनी एक पत्र लिहून शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. या पत्रात त्यांनी राज ठाकरे यांच्या बंडासाठी संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि वेळेवर कोणी यू-टर्न घेतले, हा इतिहास लोकांना माहिती आहे. मी त्याविषयी वेगळे काय सांगणार, असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच संजय राऊत शिवसेनेशी एकनिष्ठ नसल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी केला आहे. आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येराझारा घालत नाही. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय, असा दुटप्पीपणा कोण करतोय, हे लपून राहिलेले नाही.

आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे काम निष्ठेने केले. आमची छाती फाडून पाहिली तर एकावेळी एकच नेता दिसेल. पण तुमची (संजय राऊत) छाती फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील, असा टोला विखे-पाटील यांनी राऊत यांना लगावला.

कालच ‘सामना’तून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जळजळीत शब्दांत टीका करण्यात आली होती. विखे-पाटलांसारखी लाचारी अंगात भिनवायला मेहनत करावी लागते, अशी अत्यंत बोचरी भाषा या अग्रलेखात वापरण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *