लज्जास्पद : पीपीई कीट घोटाळा, भाजप प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा..!

| मुंबई | हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाच्या संकटातही घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीपीई किट खरेदी घोटाळ्यात भाजपाच्या नेत्यांवर आरोप होऊ लागले आहेत. यामुळे प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. हिमाचल प्रदेशचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा बुधवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविला आहे.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या या पीपीई किट खरेदीसंबंधी अधिकाऱ्यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामुळे पीपीई किट खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी आरोग्य संचालक अजय गुप्ता यांनी आधीच अटक करण्यात आली आहे. या क्लिपमध्ये कोट्यवधी रुपयांच्या देवाण-घेवाणीचा उल्लेख करण्यात आला आहे.

 या प्रकरणात भाजपा नेत्यांची नावे घेतली जात होती. यामुळे राजीव बिंदल यांनी नड्डा यांना पाठविलेल्या राजीनाम्यामध्ये याचे कारण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून कथित ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश सरकारने त्याविरोधात कारवाई केली आहे. गुन्हा दाखल करून त्या अधिका-याला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणात काही लोक भाजपाकडे बोट दाखवत आहेत. यामुळे मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी नैतिकतेमुळे राजीनामा देत आहे, असे म्हटले आहे. 

या घोटाळ्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही. यामुळे हे प्रकरण भाजपाशी जोडणे म्हणजे अन्यायकारक आहे. तसेच कोरोनाच्या संकटात भाजपाने केलेल्या समाजसेवेचा अपमान आहे, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी हा प्रकार लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. परंतु, बिंदल यांनी या घोटाळ्याशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पेशाने डॉक्टर असलेले राजीव बिंदल हे पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या प्रकरणामुळे हिमाचल प्रदेशात भाजप पक्ष चांगलाच कोंडीत सापडला आहे. जे.पी. नड्डा यांनी जानेवारी महिन्यात राजीव बिंदल यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, अवघ्या १४३ दिवसांत त्यांच्यावर पदावरून पायउतार होण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *