शरद पवारांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग तर आदित्य ठाकरे यांच्या टीकेला ‘ नया है वह ‘ म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली..!

| मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौ-यांवरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये केलेल्या टीकेला फडणवीस यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. ‘मंत्री बनवल्याने शहाणपणा येत नसतो. नया है वह’; अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. फडणवीस यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबईतील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. सध्या मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटते त्यांना ते मंत्री बनवत आहेत. त्यामुळे मंत्री बनवल्याने शहाणपण येतेच असे नाही. ठिक आहे ते नवीन आहेत. बोलत आहेत. बोलू देत. माझ्यासारख्या माणसाने त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नये, नया है वह, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सध्या दैनिक सामनात मुलाखत सुरू आहे. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. WWF ची कुस्ती तुम्हाला माहिती आहे का? पूर्वी तशीच नुरा कुस्ती व्हायची. त्याला मॅच फिक्सिंग असे म्हटले जायचे. आता तिच फिक्सिंग सुरू आहे. त्यांची मॅच फिक्सिंग संपू द्या. योग्यवेळी त्यावर मी प्रतिक्रिया देईलच, असे फडणवीस म्हणाले.

विरोधक सरकार पाडणार असल्याच्या शिवसेनेच्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचेही ते म्हणाले. स्वत:च स्वत:ला मारून घ्यायचे आणि रडल्याचे नाटक करायचे, अशी सध्या नवी पद्धत आली आहे. आपले अपयश झाकण्यासाठीच ही पद्धत अवलंबली जाते. सध्या शिवसेना या पद्धतीचा वापर करत आहे. कोणीही सरकार पाडणार नसताना स्वत:च कांगावा करायचा आणि मुलाखतीही देण्याचे प्रकार सुरू आहेत. कोरोनावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *