शरद पवारांचे मोदींना तिसरे पत्र, बांधकाम व्यावसायिकांच्या परिस्थितीबाबत व्यक्त केली चिंता..!

| मुंबई | कोरोना लॉकडाऊनच्या संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पत्र लिहिलं आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये पवारांनी मोदींना लिहिलेलं हे तिसरं पत्र आहे. या पत्रात पवारांनी बांधकाम व्यवसायाच्या परिस्थितीबाबत लिहिलं आहे.

 कोरोनामुळे देशातील बांधकाम व्यवसाय मोडकळीस आला आहे. मागील तीन महिन्यांपासून या क्षेत्रातील कामं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील मजुरांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे हे क्षेत्र अडचणीत आले आहे, त्याचा देशाच्या विकासदरावर परिणाम होत आहे. या व्यवसायाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन, अतिरिक्त संस्थात्मक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसंच त्यांचं व्याज माफ केले पाहिजे. बांधकाम क्षेत्रासाठी विशेष संयुक्तिक धोरणाचीही गरज आहे,  असं पवारांनी या पत्रात लिहलेले आहे.

बांधकाम व्यवसाय देशाच्या जीडीपीमध्येही मोठा हातभार लावतो, त्यामुळे राष्ट्रासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या मुद्द्यांमध्ये पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावं आणि आवश्यक पावलं उचलावी, अशी विनंतीही पवारांनी केली आहे.

याआधी शरद पवारांनी अडचणीत असलेल्या साखर उद्योगाबाबत १५ मे आणि कृषी क्षेत्रातल्या संकटाबाबत १८ मे रोजी पत्र लिहिलं होतं. या दोन्ही पत्रांमध्ये पवारांनी पंतप्रधानांना काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीतही पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.

एकंदरित , शरद पवार राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या सोबत समतोल साधत काम करत असल्याचे दिसत आहे. एक महत्वाचा दुवा म्हणून पवारांची भूमिका नेहमीच दिलासादायक राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *