राहूल गांधींवर सामन्यातून स्तुतीसुमने..!
नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी यांत समोरा समोर चर्चा व्हावी..


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १८ एप्रिल , शनिवार

मुंबई:  ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा, त्यानं काय करावं, हे त्यांनी दाखवून दिलंय. सरकारनं त्यांच्या या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल, अशा शब्दांत शिवसेनेनं राहुल गांधी यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात करोनासंदर्भात एखादी चर्चा थेट व्हावी, असंही म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला आणि करोनाबाबत पक्षाची भूमिका मांडली. करोनाविरुद्ध लढताना केवळ लॉकडाऊन पुरेसं नाही. वैद्यकीय चाचण्या वाढवल्या पाहिजेत, असं ते म्हणाले होते. केंद्र सरकारनं अधिक अधिकार व आर्थिक ताकद द्यायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.

शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून राहुल यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. ‘राहुल यांनी करोनाचा धोका ओळखून सरकारला आधीच सावध केले होते. वैद्यकीय साधनांची निर्यात थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांचं ऐकायचंच नाही हे सध्याचं सरकारी धोरण आहे, असा टोला शिवसेनेनं मारला आहे.

अग्रलेखातील काही मुद्दे:
१. ‘लॉक डाऊन’मुळे व्हायरसचा पराभव होत नाही. ‘लॉक डाऊन’मुळे वैद्यकीय सुविधा तयार करण्यासाठी वेळ मिळतो. म्हणून त्यातून बाहेर पडण्याची रणनिती तयार व्हायला हवी. हे गांधी यांचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे. फक्त घरी बसून हे संकट दूर होणार नाही, तर वाढणार आहे. केव्हा तरी घराबाहेर पडावेच लागेल. मात्र त्यावेळी काय याबाबतचा कोणताही ठोस कार्यक्रम आज तरी दिसत नाही.
२. गांधी हे देश-विदेशातील डॉक्टर्स, तज्ञ यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी संवाद साधल्यावरच राहुल यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी हे जे सर्व मार्गदर्शन केले ते देशहिताचे आहे. सरकारकडून हे समोर येणे आवश्यक असते.
३. करोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही. ही राहुल यांची भूमिका सर्वतोपरी देशहिताची, राजकीय शहाणपणाची आहे. पण सध्या शहाणपणाचा ठेका काही मोजक्या लोकांकडे आहे व त्यांना शहाणपणाचे अजीर्णच झाले असल्याने राहुल गांधी काय बोलतात याकडे पाहणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे.
४. राहुल गांधी यांची माहिती अधिक प्रगल्भ आहे. प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांनी तटस्थपणे कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा, पण राहुल गांधी यांचे ऐकणे, त्यांचे विचार पोहोचवणे हा गुन्हा ठरू शकतो.
५. चीनमधून ब्रिटिश, अमेरिकन कंपन्यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे आणि हे सर्व उद्योग आता भारतात गुंतवणूक करतील, अशी एक चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर शिवसेनेनं टीका केली आहे. ‘करोनाचे फायदे असल्याचे ‘दिवे’ काही भगत लोक पेटवत आहेत. ते मूर्खपणाचे लक्षण आहे. ही फार पुढची बात झाली. हे उद्योग येतील तेव्हा येतील. सध्या तरी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’चा बोऱ्या वाजला आहे आणि ‘स्टार्ट अप’ कधी होईल ते कोणीच सांगू शकत नाही, असा कडक चिमटा शिवसेनेनं काढला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *