काँग्रेसला धक्का : राजीव गांधी फाउंडेशन सह इतर दोन ट्रस्टची चौकशी होणार..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने गांधी कुटुंबीयांना मोठा धक्का दिला असून राजीव गांधी फाऊंडेशन व चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाने यासाठी एक इंटर मिनिस्ट्रीयल कमिटीचीही नेमणूक केली असून ही कमिटी समन्वयकाची भूमिका बजावणार आहे. याप्रकरणाचा तपास ईडीतील अधिका-यांच्या नेतृत्वात होणार आहे. गांधी कुटुंबीयांशी संलग्न असणा-या या दोन्ही ट्रस्टने नियमांचे उल्लंघन तर केले नाही ना याचा तपास करण्यात येणार आहे.

भाजपाकडून काही दिवसांपूर्वी राजीव गांधी फाऊंडेशनला चिनी दुतावासाकडून आर्थिक मदत म्हणजे डोनेशन मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तीन ट्रस्टची चौकशी होणार आहे. राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तीन फाऊंडेशनची ईडीकडून चौकशी होईल. प्रिव्हेन्श ऑफ मनी लाँड्रिग अ‍ॅक्ट आणि इन्कम टॅक्सच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप या फाऊंडेशनवर लावण्यात आला आहे.

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेची ईडीतील एक वरिष्ठ अधिकारी, संचालक या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व करणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आरोपात, राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून निधी मिळत असल्याचे म्हटले होते. त्यावेळी, काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच, भारत-चीन सीमावादावरुन लक्ष हटविण्यासाठीच भाजपा असे आरोप करत असल्याचे काँग्रेसने म्हटले होते.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी २१ जून १९९१ साली सोनिया गांधी यांनी या फाऊंडेशनची सुरुवात केली होती. हे फाऊंडेशन शिक्षण, विज्ञान आणि टेक्नॉलॉजीचे प्रमोशन, वंचित-शोषित आणि दिव्यांगांच्या प्रगतीसाठी कार्य करते. डोनेशनच्या माध्यमातून मिळणा-या पैशावरच या संस्थेचे कामकाज चालते. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या राजीव गांधी फाउंडेशन या संस्थेच्या प्रमुख आहेत. तर या फाउंडेशनमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रियंका गांधींचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.