राष्ट्रवादीला धक्का : पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ नेते दत्ता साने यांचे निधन

| पिंपरी चिंचवड | माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. साने यांना २५ जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.

दत्ता साने हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक अशी त्यांची राजकारणात ओळख होती. दत्ता साने यांच्या अशा जाण्यामुळे राष्ट्रवादीत मोठी शोककळा पसरली आहे. साने यांच्या निधनाबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहीती देतांनाच दुःख व्यक्त केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, साने यांना कोरोनासह निमोनियाचीदेखील लागण झाली होती. तसंच त्यांना हृदय विकाराचा झटका ही आला होता. अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. साने यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दत्ता साने यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी हर्षदा, १९ वर्षीय मुलगा आणि १६ वर्षीय मुलगी तर दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. दत्ता साने यांच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दत्ता साने हे ‘दत्ताकाका’ नावाने अख्खा चिखलीमध्ये प्रसिद्ध आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. चिखली परिसरातून तब्बल तीन वेळा ते निवडून आले. कोरोनाच्या या संकटात त्यांनी गरजूंना खूप मदत केली. अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात वाटप केलं. याचवेळी त्यांचा कोरोना रुग्णाशी संपर्क झाला आणि त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राजकारण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नगरसेवक यांचे दुःखद निधन झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *