वांद्रे येथील परिस्थिती नियंत्रणात..!
मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी घेतला आढावा..!


  • परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्टेशनबाहेर धडक दिली असून स्टेशनबाहेर ठिय्या देऊन हे मजूर गावाला जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत आहेत.
  • पोलिसांनी हळूहळू स्थिती नियंत्रणात आली आहे.

मुंबई : देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने मुंबईत त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्टेशनबाहेर धडक दिली असून स्टेशनबाहेर ठिय्या देऊन हे मजूर गावाला जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित केले. यावेळी देशातील लॉकडाऊन आणखी १९ दिवसांसाठी म्हणजेच ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच सर्व राज्यांची मते लक्षात घेऊन पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला. या घोषणेनंतर त्याचे पहिले पडसाद मुंबईत उमटले आहेत.

सायंकाळी चार वाजताच्या सुमारास हजारो मजुरांनी वांद्रे स्टेशनबाहेर जमा होत ठिय्या दिला व आम्हाला गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. सुमारे दीड तास या मजुरांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. ही स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रथम आवाहन केले. त्यानंतर सौम्य लाठीमारही केला. तुम्ही जिथे आहात तिथेच राहणं तुमच्या हिताचं आहे. राज्य सरकार तुमची सर्व व्यवस्था करत आहे आणि यापुढेही करणार आहे, असे सांगत पोलिसांनी लोकांची समजूत घातली. त्यानंतर हळूहळू स्थिती नियंत्रणात आली. आता तिथली गर्दी पांगवण्यात पूर्ण यश आलं आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *