आईश्री संस्थेमार्फत जिल्हा परिषदेचे शिक्षक करतायेत समाजसेवा..!
अतिदुर्गम भागात पोहचवतायेत जीवनावश्यक वस्तू..| पालघर | पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार मध्ये कोरोना महामारी मुळे अनेक लोकांची वाताहत होत आहे. त्यातच हातावर काम करुन पोट भरणारे गरजवंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची टंचाई निर्माण झाल्याने त्यांच्या साठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संदिप भदाणे, कृष्णा मुरमे यांनी मिळून उभी केलेली आईश्री सेवाभावी संस्था यासाठी काम करत आहे. गेली तीन वर्षे ही संस्था वेगवेगळ्या माध्यमातून अनाथ विद्यार्थी किंवा गरजूंच्या/वंचितांच्या मदतीला धावून जात आहे.

लॉकडाउनच्या काळात मित्रांना व्हाटस अप वर आवाहन करुन मिळालेल्या निधीतून अन्नपूर्णा कीट तयार करून संस्थेमार्फत वितरणाचे काम चालू झाले. जव्हार मधील भौगोलिक दृष्टीने खरतड असलेल्या पाड्या वस्त्यांवर सुद्धा आईश्री चे सदस्य यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करत स्वतःच्या मोटारसायकलने प्रवास करुन गरजूंना मदत केली आहे.

ह्या आईश्रीच्या अन्नपूर्णा उपक्रमाअंतर्गत एकूण ६२५ अन्नपूर्णा कीट वितरण करण्यात आले आहे. या किटमध्ये ५ किलो तांदूळ, १ किलो तूरडाळ, १ किलो तेल, १ किलो कांदे, १ किलो बटाटे , १ किलो मीठ सोबतच तीखट, हळद, बिस्किट, साबण आहे. या सोबतच कोरोना वायरस बद्दल माहिती देण्यात येत आहे. महामारी बद्दल जागृती निर्माण करुन हात धुण्याच्या पध्दती, सोशल डिस्टसिंगचे महत्व गावपाड्यांवर सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे ह्या सर्व वितरण प्रणालीमधे कधी २ते ३ किमी पायपीट करुन डोक्यावर साहित्य उचलून तर कधी डोंगर दरी उतरुन साहित्य तळागळातील गरजवंताला घर पोहच देण्यासाठी संस्थेने प्राधान्याने कार्य करीत आहे. ह्या कामात मोलाचे योगदान आईश्री चे सर्व सदस्य देत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे अधिकाधिक संस्था सदस्य हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यात कृष्णा मुरमे, गजानन तंवर, रोहित कोळी, जयवंत लोहार, अनिल तम्मलवार, अमोल चिवरे, राजेंद्र गोफणे व तेलीचा पाडा येथील राजेश पढेर सहभागी आहेत.


1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *