काही सेनापती असतातच असे; जे आपल्या सैन्याला, त्याच्या कुटूंबियांना घरात सुरक्षित बसवून स्वतः रणांगणावर लढण्यासाठी उतरतात. ते प्रत्येक क्षण लढत असतात या समाजासाठी, मायभूमीसाठी, इथल्या माणसांसाठी. वेळचं, कुटूंबाचं आणि स्वतःच्या जीवाचं भान विसरून ते पूर्ण ताकदीने लढण्याचा प्रयत्न करतात. सातत्याने तीन महिन्यांपासून असाच एक सेनापती लढतोय… अगदी प्रत्येक क्षण..! ते ही न दिसणाऱ्या दुश्मनासोबत; जीवाची बाजी लावून. ते सेनापती म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री (सेनापती) राजेश अंकुशराव टोपे उर्फ भैय्यासाहेब…!
कार्यक्षम माणसाच्या क्षमतेला योग्य दिशा आणि न्याय मिळाला तर तो माणूस सकारात्मक नि सर्जनात्मक परिवर्तन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतो; मग तो पेशाने इंजिनिअर असला तरी उत्तम आरोग्य सेवकाची भूमिकाही त्याला सहज निभावता येते. त्याला माहित नाही म्हणून तो अडखळत नाही; तर तो माहिती मिळवण्यासाठी अधिक कष्ट घेतो. तो थकला जरी; तरी पण थांबत मात्र नाही. तंत्र शिक्षणातला महामेरू असणारा तो, त्याच्यासाठी आरोग्यखातं म्हणजे अनोळखी प्रांत असतो; पण त्याचा बाऊ न करता त्या प्रत्येक गोष्टींशी तो फार कमी वेळेत परिचित होतो, एखाद्या निष्णात पंडितासारखा. न दिसणारं संकट आज त्याच्या मानगुटीभोवती घोंगावत असूनही; तो मात्र निर्भीड योध्यासारखा खंबीर उभा राहिला. कारण मिळालेली जबाबदारी हे ओझं नाही तर जीवित कर्तव्य समजणाऱ्या या योद्धयाला ही लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीय… या राज्यातल्या प्रत्येक माणसासाठी..!
त्याची आई एकीकडे मृत्यूशी झुंज देतीय, मुलगा मेंदूच्या आजाराशी आताच कुठे लढून बाहेर पडलाय, सह्याद्रीसारख्या खंबीर पाठीशी असणाऱ्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्याचं दुःख अजून भळभळत असतानाही पायाला भिंगरी लावून हा योद्धा राज्यभर न दिसणाऱ्या गणिमाला (कोरोनाला) संपण्यासाठी योजना आखतोय. तळमळीने लोकांना आवाहन करतोय. अगदी प्रत्येक बारीक गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी धडपडतोय. मास्क, सॅनिटाइझर, पीपीई किट उपलब्धतेपासून, कोव्हिड सेंटर, कोरंटाईन सेंटर दवाखाने उभारणीपासून ते प्रत्येक रुग्णांना आवश्यक ती सुविधा देण्याचा आणि त्याबरोबरच आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांचा धीर वाढवण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करणारा असा आरोग्यमंत्री या महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने यापूर्वी कधीच पहिला नाही.
तीन महिन्यांपूर्वी युवा प्रेरणा कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आरोग्य मंत्री राजेश टोपे व त्यांच्या सुविद्य पत्नी मनिषाताई टोपे यांची प्रकट मुलाखत घेण्याचा योग आला होता. या मुलाखतीच्या निमित्ताने एका राजकारणापलीकडल्याच्या माणसाची ओळख झाली. शरदचंद्र पवार साहेबांच्या तालमीत घडलेल्या आणि वडील कर्मयोगी अंकुशराव टोपे यांचा आदर्श घेऊन शिक्षण, शेती, आरोग्य, तंत्रज्ञान, ऊर्जा अशा प्रत्येक क्षेत्राबद्दल परिपूर्ण अभ्यास असणारा, त्यावर बोलणारा, विधानसभेत प्रत्येक प्रश्नांवर तितक्याच आत्मविश्वासाने मत मांडणारा पवार साहेबांनंतर सर्वंविषयांचा व्यासंग असणारा महाराष्ट्राच्या राजकारणात राजेश टोपे यांच्यासारखा दुसरा नेता कदाचित दुर्मिळच असावा. अगदी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत सातत्याने कामाला महत्व देणारा हा नेता कधी कुणावर टीका- टिपण्णी करताना महाराष्ट्राने पाहिला नाही. बोलण्यातील नम्रता आणि वागण्यातील संयम हीच त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख. कुटूंबामध्ये असंख्य संकटे उभी असताना एकट्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या घेऊन प्रत्येक जबाबदारी तितक्याच खुबीने निभावणारा तो, कधी उत्तम कारखानदार… तर कधी उत्तम शिक्षण संचालकाची भूमिका पार पाडतो. कधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अडचणी ऐकणारा लोकनेता होतो; तर कधी प्रशासनाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सडेतोड प्रश्न विचारणारा प्रशासक होतो. राज्यभरातून त्यांच्याकडे वेगवेगळी कामे घेऊन आलेल्या त्या प्रत्येकाचं समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करणारा तो सामान्यातून असामान्यत्वाकडे सातत्याने प्रवास करतो.
कार्यक्षमता असूनही, असामान्य कर्तृत्वाचे धनी असूनही राजेश टोपे आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीसे पडद्याआडच राहिले. कधी प्रसिध्दीचा हव्यास म्हणून त्यांनी सवंग प्रसिद्धीसाठी उगाच भडंग विधान केली नाहीत, ना अनाठायी भूमिका घेतल्या, समाज मने दुखावतील, प्रशासनाला वेठीस धरल्या जाईल अशी कृती त्यांच्या कडून कधी घडताना दिसली नाही. समाजात तेढ निर्माण करणं किंवा टीकेचा विषय होणं अशा अवास्तव चुका त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कधी घडताना दिसल्या नाहीत. उलट प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे लढत राहणं; मग कधी जायकवाडीच्या पाण्यासाठी, तर कधी पिकविम्यासाठी, तर कधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ते संयमाने लढताना दिसले. त्यांच्यातील हाच संयमीपणा त्यांच्या लढवय्या वृत्तीच दर्शन घडवतो. हीच त्यांची लढाऊ वृत्ती या कोरोना संकटात अख्या जगानं पाहिली. प्रत्येक वेळी संकटाना आक्रमकपणे उत्तर देण म्हणजेच पराक्रम नसतो; तर प्रतिकूल परिस्थितीत संयमानं खंबीरपणे शांत उभं राहण्यातही पुरुषार्थ असतो हे त्यांनी या कोरोना युद्धात दाखवून दिलं. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर पडद्यामागे राहीलेला हा कर्तृत्ववान तारा या संकटाच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक पटलावर झळाळून चमकताना दिसला.
आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी आजवर पूर्णपणे पराक्रमाची शर्थ केली आहे. देशात सर्वात कार्यक्षम आरोग्यमंत्री म्हणून त्यांना अगदी विरोधकांनीही शाबासकी दिली आहे. राज्यातल्या प्रत्येक परिस्थितीची माहिती ते आजही समाजमाध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचवत आहेत. अगदी इंग्रजी वाहिन्यांवर देखील कोरोनासंबंधाने त्यांच्या मुलाखती पाहून महाराष्ट्राच्या राजकारणात अभ्यासू, कार्यक्षम आणि विद्येचे अलंकार असणारे नेते आहेत याची जाणीव त्यांनी करून दिली. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे सेवेकरी स्वतःच्या जीवावर खेळून रुग्णांसाठी दिवसरात्र परिश्रम घेताना पाहून राजेश टोपे यांनी एसी मध्ये बसून नुसत्या सूचना दिल्या नाहीत; तर प्रत्यक्ष जीवावर उदार होत प्रत्येक ठिकाणी स्वतः जाऊन प्रश्न समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राष्ट्रीय विषाणू केंद्र असो की मग प्रत्यक्ष कोरोना कक्षात जाऊन कोरोना रुग्णाची भेट घेण्याचा प्रसंग. मालेगावच्या अस्वस्थ सामाजिक परिस्थितीत प्रशासन आणि नागरिक यांच्यात सुसंवाद घडवून आणण्यासाठी घेतलेला पुढाकार असो की मग मजुरांना परप्रांतीयांना रेल्वेस्टेशनवर जाऊन केलेली विचारपूस कौतुकास्पद होती. ज्यावेळी मोठं मोठी लोक घरामध्ये सुरक्षित बसली होती; त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोरोनाच चक्रव्यूह भेदण्यासाठी संघर्ष करताना दिसत होते ते फक्त राजेश टोपे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातुन ठाणे येथे १००० बेडचं रुग्णालय उभारणी, महाराष्ट्र्रातील प्रत्येकासाठी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची तरतूद, अनेक ठिकाणी कोरोना रुग्णालयाची उभारणी, देशात सर्वात जास्त कोरोना चाचण्या, कोरोना चाचण्यासाठी आधुनिक लॅब उभारणी, प्रत्येक शहरात विलीगिकरण कक्षाची निर्मिती, सॅनिटाइझर निर्मितीसाठी पुढाकार, लॉकडाऊन परिस्थितीत उद्योजक, धर्मगुरू, प्रशासकीय अधिकारी आणि जनता यांच्यात सुसंवाद घडवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेले प्रयत्न, स्वतः धारावीच्या झोपडपटीपासून ते रुग्णांच्या बेडपर्यंत जाऊन धीर देणारा हा आरोग्यमंत्री यानंतरच्या काळातही महाराष्ट्राच्या जनमानसांच्या काळजावर कायम उमटलेला दिसेल यात शंका नाही.
महाराष्ट्रभर काम करत असताना लॉक डाउन मध्ये आपल्या मतदार संघातही अगदी कालव्याला पाणी सोडण्यापासून कापूस उत्पादकांसाठी खरेदी केंद्र सुरू करण्यापर्यत प्रत्येक बाबतीत त्यांचे लक्ष होते. लॉक डाऊनमुळे गोरगरीब कुटूंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांच्या पुढाकारातून मतदार संघात धान्य व किराणा किटचे त्यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले, यावरून आभाळभर काम करत असतानाही त्यांना मातीचा विसर पडला नाही हे त्यांनी दाखवुन दिलं.कोरोना रोखनं ही आता प्रत्येकाची जबाबदारी आहे. आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलीस व त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आरोग्यमंत्री यांनीही पूर्ण ताकतीने आजवरची लढाई लढली आहे. या लढाईत अनेक योध्याना कोरोनाची लागणही झाली; तर काहींना यात मृत्यूला सामोरं जावं लागलं. एकीकडे एवढ्या आत्मीयतेने आजवर हे योद्धे लढत असताना आपण मात्र गाफील राहून दुसऱ्या दारातून शत्रूला बोलावण्याची चूक केली तर या संघर्ष योध्यांच्या आजवरच्या संघर्षावर आपण पाणी टाकल्यासारखं होईल. त्यामुळे या संघर्षयोध्यांच्या संघर्षाचा आदर नि सन्मान ठेऊन कोरोनाला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्या प्रजेच्या हितासाठी गेल्या तीन महिन्यापासून घर-कुटूंबापासून दूर राहून, आईच्या आजाराचं दुःख मनात कोंडून ठेऊन, कोरोनाच्या संकटाला जीवाची पर्वा न करता पाठीवर घेऊन एक सेनापती लढत असताना प्रजा म्हणून आपण त्यांचं मनोधैर्य वाढवलंच पाहिजे. आरोग्य सेनापती राजेश टोपे व त्यांच्या मावळ्यांचा या प्रतिकूल परिस्थितीतला संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील.
तो जिंकेल की हारेल हे माहीत नाही… पण तो प्रत्येक क्षण लढत राहिला हे मात्र इतिहास कायम लक्षात ठेवीन…!अशा लढवय्या कोरोना योद्ध्याला मानाचा सलाम…!
– दादासाहेब थेटे (Dy. CEO, दैनिक लोकशक्ती )
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री
छान विचार गुरूजी