विशेष लेख : पर्यावरण संवर्धन हा धर्म व्हावा..!

आज आपण २१ व्या शतकात वावरत आहोत आत्ताच्या काळापेक्षा फक्त १५० वर्षांपूर्वी जग कसं असेल ? याची कल्पना करा. त्या वेळच्या प्रगत देशांमध्ये सुद्धा लोक घोडागाडीचा वापर करत होते; इंटरनेट, संगणक, दूरदर्शन या गोष्टी कोणाच्या स्वप्नातही नव्हत्या परंतु आज मोबाईल, संगणक, इंटरनेट या गोष्टी तर परवलीच्या बनल्या आहेत. अवकाशयाने आणि कृत्रिम उपग्रहांची तर रेलचेल सुरू आहे. पण यासाठी शक्य होईल तेवढा निसर्ग ओरबडण्याचे काम जगातील प्रत्येक देशानं केलं ! आपल्यामुळेच आतापर्यंत ६०% पर्यावरणाचा ऱ्हास झाला हे आपल्याला कळलं देखील नाही.(special article on environment)

पर्यावरण म्हणजे आपला परिसर.. मानवाच्या सभोवतालच्या परिसराला पर्यावरण असे म्हणतात. याच परिसरातून त्याला अन्न, हवा, पाणी, माती, दगड खनिजे, इंधने, वनस्पती, प्राणी उपलब्ध होत असतात. माणूस यांचा वापर स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. पण गरज आणि प्रगती यांच्या अतिरेकामुळे माणसाने पर्यावरणावर आपल्या ‘हव्यासाचा’ हल्ला चढवला आहे. जर स्वतःच्या मर्जीने जगातील प्रत्येक देशाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर निसर्ग संपवला तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी लवकरच धोक्यात येईल, म्हणून १९७२ साली झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत ५ जून हा दिवास पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विषय कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर ठोस कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. १०० पेक्षा जास्त देश यामध्ये सहभागी झाले आहेत. निसर्गाच्या हव्या तशा वापरामुळे आजवर अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या मार्गावर आहेत. यातूनच प्रचंड मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवरील जीवांची विविधता संपुष्टात आली आहे. विविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०११-२०२० हे दशक ” जैवविविधता दशक ” म्हणून जाहीर केले आहे. अशा प्रकारच्या मोहिमा उदात्त हेतू ठेवून जरी सुरू केलेल्या असल्या तरी इथे गरज आहे ते जगातल्या प्रत्येक देशाने आणि प्रत्येक माणसाने स्वतःला नियंत्रित ठेवण्याची..(special article on environment)

मानवाकडून चाललेलं पृथ्वीचं शोषण आणि वातावरणाची अवनती आता धोक्याच्या पातळीपलीकडे गेली आहे, माणसाच्या चंगळवादाचाच हा एक भयंकर परिणाम आहे. वापरा…!वापरा…!! वापरा…!!! आणि फेकून द्या….! या संस्कृतीमुळे माणसांनी पृथ्वीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. यातूनच वायु, माती, जल यांचे प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, ऋतू-बद्दल, प्रचंड जंगलतोड, मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्ग, मुद्दामून केलेले जनुकीय बदल, प्रचंड प्रमाणात होणारी मासेमारी, औद्योगीकरण, प्रचंड मोठी मोठी बांधकामे, दररोज तयार होणारा हजारो टन कचरा, बेजबाबदारपणे होणारा पाण्याचा वापर, विशिष्ट वनस्पतींचा अतिवापर, ओझोनच्या थरातील छिद्रे, प्रचंड मोठ्या प्रमाणात चाललेले खाणकाम, त्यातून होणारी नैसर्गिक साधन संपत्तीची लूट, आण्विक कचरा व त्यातून निर्माण होणारा पर्यावरणास धोका, रासायनिक खतांचा अतिरेक, प्रकाश व ध्वनी प्रदूषण, अनिर्बंध अव्यवस्थित नागरीकरण, आम्लपर्जन्य, वैद्यकीय कचरा आणि ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळणे या आणि यासारख्या कित्येक समस्या माणसाने स्वतः निर्माण केल्या आहेत. आणि एकूणच सर्व सजीव सृष्टी अस्तित्वाच्या संकटात स्वतःहून ढकलली आहे.

भविष्यातील संकटांचा सामना कसा करावा याचे साऱ्या जगातील देशांना मार्गदर्शन करणारे  संदीप वासलेकर यांनी त्यांच्या “नव्या युगाचा आरंभ” या पुस्तकात ‘ अर्थ ओव्हरशूट डे’ हा सिद्धांत समजावून सांगितला आहे. एका वर्षात निसर्गात तयार होणारी नैसर्गिक साधनसंपत्ती मानव त्याच वर्षातल्या ज्या दिवशी संपवतो त्या दिवसाला ‘अर्थ ओव्हरशूट डे’ असं म्हणतात. जर हा दिवस २१ ऑगस्टला आला तर याचा अर्थ असा की एक जानेवारी ते २१ ऑगस्ट या कालावधीतच आपण सर्व संसाधने (नैसर्गिक साधनसंपत्ती) संपवून टाकली. पुढील वर्षांची जीवनचर्या जर अशीच चालू राहिली तर आपल्याला पृथ्वीसारख्या आणखी दीडपट ग्रहांची गरज भासेल. (special article on environment)

भारतीय पर्यावरण चळवळ चालवणारे Adv गिरीश राऊत यांनीसुद्धा आपल्यासमोर पर्यावरण ऱ्हासाचे जिवंत उदाहरणे मांडली आहेत. वातावरणात हजारो टन विषारी वायू व सूक्ष्म राख पसरवली जात आहे उद्योग, वीजनिर्मिती, बांधकाम, वाहतूक , रसायने, आधुनिक शेती या सर्वांमुळे होणारी जंगलतोड तसेच सागरातील हरितद्रव्याचा नाश यामुळे वातावरण बदलत आहे पृथ्वी तापत आहे. अगदी उदाहरण सांगायचे झाले तर या वर्षीच्या उन्हाळ्यात चंद्रपूरचे तापमान ४८ डिग्री पर्यंत पोहोचले येत्या पाच ते दहा वर्षात येथील तापमान ५५ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचेल असे UNO (युनो) व NASA (नासाने) इशारे दिले आहेत. म्हणूनच माणसांनी आता जागं होणं गरजेचं आहे आणि त्यासोबत निसर्गनियम प्रत्यक्ष जगण्यात आणणं आवश्यक आहे. त्यासाठी नाहक गरजा न वाढवता प्रत्येकाने पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करायला हवी. यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात 5R ही संकल्पना अवलंबू शकतो

 • Refuse :- शक्य होईल तेवढा वस्तूंचा वापर कमी करणे ,म्हणजे नकार देणे.
 • Reduce :- वस्तूंचा वापर कमीत कमी करणे.
 • Reuse :- वस्तूंचा पुनर्वापर करणे.
 • Repurpose :- एका वस्तूचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वापर करणे .
 • Recycle :- वापर झालेल्या वस्तूंपासून पुन्हा नवीन वस्तू बनवणे.

वरील 5R आपल्या पृथ्वीला निरोगी बणण्यास मदतीचे ठरतील.काहीअंशी याची सुरुवातही झालेली आहे पण गरज आहे ती प्रत्येक व्यक्ती पासून 5R संकल्पना प्रत्यक्ष जगण्यात उतरवण्याची ….!

पर्यावरण संवर्धन हा विषय जेव्हा चालू असतो तेव्हा पर्यावरण संवर्धनात आपली भूमिका काय ? याचाही विचार होणे तेवढेच महत्वाचे आहे यासाठी आपण आपल्या घरापासून खालील उपाय करू शकतो.

 • पाण्याचा काटकसरीने वापर.
 • विजेचा कमीत कमी वापर गरज नसताना विजेची उपकरणे बंद ठेवणे.
 • वृक्षतोड 100% थांबवणे {नाशिक शहरात झाडं वाचवण्याचे अफलातून प्रयोग आपणास पाहता येतील } वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
 • ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करणे
 • रिचार्जेबल बॅटरी वापरणे
 • धूम्रपान बंद करणे
 • वाहनांची सर्विसिंग वेळच्यावेळी करून घेणे खाजगी वाहनापेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर करणे.
 • जवळच्या कामासाठी सायकल वापरणे.
 • प्लास्टिक बॅग न वापरणे
 • रासायनिक खतांचा अतिरेक टाळावा आणि ही संस्कृती नष्ट करावी.
 • घराच्या बाहेर पडताना बाजारात जाताना हातात एखादी कापडी पिशवी असावी.
 • कचरा न करणे आणि घरातील कचऱ्याचे ओला कचरा सुका कचरा असे वर्गीकरण करणे.
 • वॉशिंग मशीन चा वापर वेळेची गरज पाहूनच करणे.
 • शेतीला अथवा झाडांना सूर्यास्तानंतर पाणी देणे.
 • वेगवेगळ्या दुकानातून साहित्य घेताना प्लॅस्टिक बॅग ला नकार द्यावा.
 • LED अथवा फ्लोरोसंट बल्बचा वापर करावा.
 • हॉटेलमध्ये गेल्यावर अर्धा ग्लास पाणी जाणीवपूर्वक मागवणे.
 • घराच्या जवळ झाडे लावणे म्हणजे
 • A/C ची गरज भासणार नाही.
 • कागदाचा वापर पुरेपूर करावा दोन्ही बाजूंनी प्रिंट घ्यावी गरज असेल तरच प्रिंट घ्यावी.
 • फर्निचर घेताना सेकंड हॅन्ड फर्निचर घ्यावे.
 • कागदी ,प्लास्टिक कपापेक्षा सिरॅमिक किंवा स्टीलच्या ग्लास चा वापर करावा.
 • थर्माकोलचा वापर करू नये.
 • वापरून झालेल्या पाण्याचा वापर, दुसऱ्या कामांसाठी करावा.
 • फास्ट फूड विकत घेऊ नये आणि खाऊ नये.
 • वाहनातल्या टायरमध्ये योग्य हवा ठेवावी जेणेकरून गाडीचा मायलेज वाढेल.
 • फुलांची, फळांची झाडे लावावीत.

या आणि यासारख्या उपायांचा अवलंब प्रकर्षाने करण्याची वेळ आता आली आहे अन्यथा या पृथ्वीवर आपले अस्तित्व लवकरच धोक्यात येईल..! म्हणून गरज आहे ती पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याची..

 एकंदरीत आपले भविष्यातील अस्तित्व आपल्या मानसिक तयारीवर अवलंबून आहे.bचंगळवाद , प्रांतवाद, वैचारिक वाद, धर्मवाद इत्यादी निरर्थक सिद्धांतांच्या मागे धावण्याऐवजी आपण सर्वांनी मूळ ” मानवी मूल्यांवर विश्वास ठेवून पर्यावरण संवर्धन हा एकमेव धर्म अवलंबावा..! ” अन्यथा पर्यावरणला असमतोलाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढणे अशक्य होईल….! 

म्हणून मग या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कवी दृष्यंत कुमार यांच्या ओळी मला आठवतात ….

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए ,आग जलनी चाहिए …..!

म्हणून म्हणावसं वाटतं

सावन की रिमझीम फुवार से
ताल तलाया भरने दो ,
रोको ! रोको धरती माता को बंजर होणे से रोको….!(special article on environment)

प्रविण शिंदे , बीड ( लेखक स्वतः विज्ञानवादी आणि पर्यावरण पूरक चळवळीत सक्रिय काम करत आहेत.)

नवी लेखमाला या रविवारपासून..!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *