विशेष लेख : माणसा, हे काय केलंस रे..!

ह्रदयात धस्स करणारी घटना केरळात घडली. इतकं नीच कृत्य माणसांकडून होणे, हे भयानक आहे. त्यासंबंधी मन हेलावणारे सूरज उतेकर यांचे हे पत्र..!

तू चुकलीस..

प्रिय देवीम्मा,

सगळ्यात आधी तुझी माफी मागतो. खरेतर तुला प्रिय म्हणायची आमची कुवत नाही. आम्ही त्या पात्रतेचेच नाही आहोत. सकाळपासून तुझ्याबद्दलची बातमी वाचतो आहे आणि राहून राहून ही बातमी खोटी निघू दे इतकच वाटतं आहे…!

तू भुकेने व्याकुळ होतीस का.?. की तहानलेली होतीस.?. का आलीस जनावरांच्या नरकात तुझा स्वर्ग सोडून.?. इतक्या वर्षांच्या अनुभवांनंतर तुमच्यातल्या कुणी लिहिली नाही का मनुष्यनीती.?. तुमच्या अभ्यासक्रमात नाही आला का मनुष्य जनावर.?. तुला कुणी आमची ओळखच करुन दिली नव्हती, कधीच.?. का ठेवलास विश्वास.?.

सायलेंट व्हॅली मधून तू अन्नाच्या शोधात पलक्कड जिल्ह्यात आलीस. तुझ्या मनात असतं तर अवघी वस्ती उद्ध्वस्त करत धुडगूस घालू शकली असतीस. पण तू असं काहीच केलं नाहीस. तू सगळ्यात मोठी चूक केलीस आमच्यावर विश्वास ठेवून. कुणीतरी तुला अननस खायला दिला आणि तू त्याचा विश्वासाने स्वीकार केलास. इथेच फसलीस. इथेच उरली सुरली माणुसकी संपली गं.!. आम्ही तुझी भूक नाही भागवली, आम्ही आमचा उन्माद जागवला. आम्ही स्फोटकं दिली तुला विश्वासाने.!. आणि त्या स्फोटकांनी मात्र नाही केला आमचा विश्वास घात. ती फुटली तुझ्या तोंडात.. अवघं तोंड फाटलं, रक्ताळलं.. वेदना नाही का गं झाल्या तुला.?. कसं सहन केलंस तू इतकं सगळं.?. इतका मोठा विश्वासघात होऊनही तू आम्हाला इजा नाही केलीस. तू तशीच शांतपणे चालत राहिलीस.. थकलीस तरीही चालत राहिलीस.. आणि शेवटी वेल्लीयार नदीच्या पात्रात जाऊन निश्चल ऊभी राहिलीस.(Kerala elephant incident)

तुझ्या मदतीला वनाधिकारी मोहन यांनी निलकांथन आणि सुरेंद्रन ह्या दोन हत्तींना आणलं खरं. त्यांनी तुला पात्रातून बाहेर येण्याचा मार्गही दाखवला. मात्र आता कुठे तुला मनुष्यातला जनावर समजला होता. तू आतून तुटली होतीस. तू नाही ऐकलंस कुणाचं.. नाही आलीस बाहेर.. तुझ्या मनाला अतोनात वेदना होत असणार हे नक्की. शेवटी तू उभ्या उभ्याच त्या नदी पात्रात जीव सोडलास. शेवटी कळलं तुझ्या उदरात तुझं बाळ वाढत होतं. तू अम्मा होणार होतीस.. आम्ही गणरायाला पूजतो.. केवळ तुझ्या मुखाशी साधर्म्य साधणारं म्हणून त्याचं ते श्रीमुख आम्हाला आपलंसं वाटतं. तू देवी आहेस.. तू अम्मा आहेस.. देवीम्मा, जमलंच तर आम्हाला माफ कर असं मी अजिबात म्हणणार नाही. माझ्यात किंचितही संतपण नाहीये, देवीम्मा.. त्यामुळे आमच्या दुष्कृत्यांना पोटात घालून त्यांना मोठ्या मनाने माफ करण्यासाठी मी तुला अजिबात विनवणार नाही. अवघ्या सृष्टीचं कल्याण व्हावं असं मनोमन वाटतं आणि म्हणून सृष्टीतून मनुष्य जमात कायमची संपुष्टात यावी असच नेहमी मनोमन वाटत राहिलंय. तू चुकलीस.. आम्ही आमच्या जातभाईंचे कधी झालो नाही तर तुझे तरी कसे होऊ.?. आतातरी समस्त प्राणी जगताने मनुष्यनितीचा अभ्यासक्रम जंगलोजंगली सुरू करायला हवा.

शिक्षितांची संख्या वाढली म्हणजे माणूस सुसंस्कृत होत नाही हेच केरळच्या उदाहरणावरून पुन्हा अधोरेखित होतय. अजूनही वाटतय ही बातमी खोटी असावी.. साफ खोटी..(Kerala elephant incident)

तुझा नसलेला,
नालायक मनुष्य जनावर..

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *