विशेष लेख : क्वारंटाईन.. माणूस की माणुसकी?

जगभरात कोरोनाव्हायरसचे अकांडतांडव सुरू आहे. ‘लॉक डाऊन’, ‘क्वारंटाईन’, ‘स्व्याब ‘ या शब्दांची “भिरं भिरं ” गोल-गोल फिरत सर्वांनाच चक्रावून टाकत आहेत. अशिक्षित पासून शिक्षिता पर्यंत सर्व लोकांच्या चर्चेचा विषय एकच.. कोरोना.. काही जण तर त्यावर पीएचडी, संशोधन करत असल्यासारखे अकल्पित भाष्य करताना दिसत आहेत. मुळात या रोगाच्या संक्रमणाच्या विरोधात जागृतीची गरज आहे पोकळ उपायांपेक्षा जागृतीची गरज आहे. समुपदेशनाची गरज आहे. लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारख्या शब्दांची फेकाफेक करताना त्याचे खरा अर्थ बहुतांशी जणांना उमगलेच नाहीत हे उत्तरोत्तर वाढणाऱ्या रुग्ण संख्येवरून दिसून येत आहे. त्यात सध्या बोचणारा शब्द होय बोचणाराच.. शब्द म्हणजे “क्वारंटाईन”

जनता कर्फ्यू नंतर कोरोना संक्रमणाच्या धोक्यापासून अटकाव होण्यासाठी लॉक डाऊन चे शस्त्र उपसले गेले. आतापर्यंत चार वेळा ०.१ ते ०.४ असे नवीन version स्वरूपात हळूहळू करून वाढवत नेला. या लोक डाऊन मुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचे स्वरूप महाभयंकर म्हणावा लागेल. जे दृश्य आहे त्यापेक्षाही जे अदृश्य आहे त्याची भविष्यातील नांदी भीतीदायक वाटते.. लॉक डाऊन जाहीर झाल्यामुळे देशभरातील लोक जिथे आहेत तिथे अडकून पडले. पुन्हा त्यांना मूळ गावी पोहोचवण्यासाठी यंत्रणा उभी करावी लागली. त्याचे यशापयश हा तसा वादाचा मुद्दा… असो.. संशयित रुग्ण किंवा कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना संक्रमण झाले की नाही हे पडताळण्यासाठी किमान १४/२८ दिवस घरी अगर संस्थात्मक स्वरूपात स्थानबद्ध करणं म्हणजे “क्वारंटाईन..” म्हणजे या बंदिवासात संशयित रुग्णांमध्ये लक्षणे नाही दिसून आली तर त्याला त्याच्या कुटुंबात मिसळण्याची परवानगी दिली जाते. अन्यथा थेट उपचारासाठी रवानगी. त्याचबरोबर काहीसे प्रवासात अडकलेले, मूळ गावी परतीचा प्रवास करणारे यांनाही संभाव्य संक्रमित म्हणून त्यांना त्यांच्या गावी, घरी क्वारंटाईन केलं गेलं. जेंव्हा हे लोक मूळ गावी, अगर नोकरीच्या ठिकाणी हजर व्हायला प्रवास करून गेली तेव्हा मात्र त्यांना ही प्रक्रिया अतिशय जाचक होऊ लागल्याचे चित्र दिसून येतं. वास्तविक पाहता माणूस हा मायेचा, आपुलकीचा आसुसलेला, समाजप्रिय प्राणी.. पुन्हा त्याला समाजापासून अचानक दूर राहावे लागले तर असे त्रास होणे स्वाभाविकच… एकंदरीत त्याच्या स्वतःच्या व समाजाच्या काळजी पोटी हा चौदा ते अठ्ठावीस दिवसांचा वनवास स्वतः होऊन सहन करावा लागणार असतो.

एकार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने ही काळाची गरज असली आणि तिचा हेतू शुद्ध असला तरी ग्रामीण भागात त्याच्या स्वरूपात भयानक व अनियंत्रित भेसळ होत चालल्याचे दिसून येतंय. शहरांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षात होणाऱ्या व्यक्तीच्या गैरसोयींचा पाढा तर बऱ्याचदा मीडिया तून समोर येत असतो.. पिण्याचे पाणी, शरीर स्वच्छतेसाठी पाणी, अन्नाची सोय याबाबतचा गलथानपणा अशा बाबी असो किंवा अलगीकरणाच्या नावाखाली दाटीवाटीने राहणं, सुविधांसाठी गर्दी करून सोशल डिस्टंसिंग चा बोजवारा अशा एक ना अनेक बाबी समोर येत आहेत..अशा अपवादात्मक बाबी सोडता.. शक्य तितकं शासन झटताना दिसत आहे… ह्या ताणामुळे यंत्रणासुद्धा थकत चालले आहे. ही जरी खरं असलं तरी मनुष्यजातीच्या जीव वाचवण्यासाठी चाललेल्या अशा प्रयत्नात मनुष्य जातीचाच बळी जाते की काय असा प्रश्न आ वासून समोर उभा राहतो. जेव्हा क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीला मिळणारी वागणूक ही शापिता सारखी मिळते. ग्रामीण भागात तर अतिशय अपमानास्पद वागवणूक दिसून येते.. अनलिमिटेड कॉलिंग च्या दुनियेत कॉलर ट्यून वर “रोग्याची नव्हे, रोगाशी लढायचं आहे” हे वारंवार ऐकूनही ती प्रत्यक्षात संक्रमण झालेल्या व्यक्तीशी समाज जणू लढाई करताना दिसत आहे.. याहून कहर म्हणजे प्रशासनाने सहकार्यासाठी गावोगावी तयार केलेल्या दक्षता समितीचे स्वयम् नियंत्रित, नवनवे शोधत्मक -जाचक नियम व अटी.. अशा नियमांनी त्रस्त होऊन क्वारंटाईन झालेल्या व्यक्तीला कोरोनाने मृत्यू होण्याअगोदरच मानसिक दबाव, हृदयरोग, रक्तदाब अशा कारणांनी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. वडिलांच्या अंतकाळी त्याचा मुलगा भीतीने अंत्यविधीसाठी नकार देत आहे म्हटल्यावर किती भयंकर वातावरण समाजात तयार झालेय याची ही झलकच म्हणावी लागेल. रोगापेक्षा उपाय भयंकर असल्याचे दिसून येत आहे.. याचं एकमेव कारण जनजागृतीचा अभाव… बेपर्वाईने, बेजबाबदारपणे पसरविलेलं सोशल मीडियावरील अगाध ज्ञान. एक व्यक्ती क्वारंटाईन करण्याचा नियम असल्याने व दक्षता समितीच्या सल्ल्याने १४ दिवस गावाबाहेरच्या शाळेमध्ये दहा-बारा खोलीत एकटाच रात्र दिवस राहत होता… त्या शाळेच्या गेटवर निदान एखादा सुरक्षारक्षक तरी ठेवायचा… दुर्दैवाने चौदाव्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आणि कोरोना चा त्याचा रिपोर्ट नंतर निगेटिव्ह आला…. काय मानसिक त्रास झाला असेल त्याला.? माणसाच्या मनात काय द्वंद्व, मानसिक खेळ होत असेल त्या एकांतात कोण जाणे.. त्या चौदा दिवसात कोणीही तिकडे फिरकला सुद्धा नाही.. जेवणाचा डबा गेटवर कोण कधी ठेवून गेलं याची कल्पना ही नसायची.. जणू शापित असल्यासारखे समाज त्याला नाकारत असेल तर निश्चितच धोकादायक आहे तेही भारतासारख्या समाजशील देशात… सामाजिक अंतर ठेवून अधून मधून त्याला मानसिक आधार दिला असता तर एक बळी गेला नसता… दुसरं उदाहरण.. सहा महिन्याच्या गरोदर स्त्रीला गावाबाहेर झोपडीत राहण्यास भाग पाडणारे गावकरी त्याहूनही भयंकर स्वतःच्या पत्नीच्या सोबत करण्याची मानसिकता नसलेला तिचा पती सुद्धा कुठल्या संस्कृतीचे प्रतीक म्हणायची.. रात्री-अपरात्री भीतीदायक वातावरणात,, साप विंचू, यांच्या सान्निध्यात अशा अवस्थेत राहायला भाग पाडणे म्हणजे अंदमानातील काळा पाण्यापेक्षा भयंकर शिक्षाच म्हणावे लागेल..काही जणांच्या जागरूकतेमुळे व जुन्या जाणत्या लोकांमुळे त्या माउलीला गावातल्या एका रिकाम्या घरात क्वारंटाईन केलं गेलं… हेच काय ते तीच नशीब..

काही दक्षता समित्यांचा अति उत्साह तर मस्तकात जाळ करून सोडतो. जेव्हा हे लोक चौका चौकात चर्चा करत, गटागटात बसतात आणि यांची पोर हातात बॅट घेऊन माळावर खेळायला जातात, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवीत खेळ खेळतात.. तोंडाला मास्क लावत गावभर उंडारत फिरतात तेव्हा ह्यांनाच पहिल्यांदा क्वारंटाईन करायला पाहिजेत असं वाटतं. काही गावातील समित्यांनी तर गाव बंदी ऐवजी मुख्य रस्तेच बंद करून टाकले. काहींनी खोदले तर काही ठिकाणी लाकडाचे ओंडके टाकले. ह्या लाकडाला धडकून, चरात पडून रात्रीचे अपघात होण्यास कारणीभूत ठरले.. असले उपाय म्हणजे मरणाला निमंत्रण.. मुख्य रस्ते अडवणे हे दक्षता समितीचे विधायक काम आहे काय? या अपघातांना जबाबदार कोण? आधी १४ दिवस/२८ दिवस प्रशासनाने दिलेल्या टाइम कमी की काय, गावकरी स्वतःच्या मनाने दिवस ठरवू लागलेत..आणि त्याची मजा घ्यायला सुद्धा कमी नाहीत. . अशी मनमानी करत असतील तर विचार करावासा वाटतं की ही माणसं आहेत की जनावर? कोरोना आज आहे. उद्या असेल, भविष्यात नसेलही कदाचित. पण तुम्ही आम्ही माणूस म्हणून ह्या जगात राहायचं आहे याचंही भान असायला हवं. काही दक्षता समित्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्शवत कार्य करत आहेत. त्यांचेही कौतुक. पण पोकळ सुरक्षिततेच्या नावाखाली माणुसकीला काळीमा लावणाऱ्या या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या अशा संशयित व्यक्तींना क्वारंटाईनच्या नावाखाली वाळीत टाकण्याचे प्रकार चालू असल्याचे दिसून येते.

एक महिला कर्मचारी आपल्या मुख्यालयी उपस्थित राहण्यासाठी लहान मुलां सोबत आली तर गावकऱ्यांनी म्हणे त्यांचे घर चौकात आहे, लोक गप्पा मारायला चौकात बसत असतात. लोकांची ये-जा असते, त्यामुळे तिथे राहायचं नाही असा पवित्रा घेतला होता. लोकांना चौकात बसायला मिळत नाही.. म्हणून क्वारंटाईन झालेल्या माणसांची अडचण वाटायला लागली. हे कुठल्या समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत? ुर्दैवाने त्या महिला कर्मचार्‍याच्या घरात छोटासा अपघात झाला. हाताला जखम झाली जखमेतून रक्तस्त्राव चालू झाला. तर दवाखान्यापर्यंत पोहोचण्यास सुद्धा कोणी तयार झालं नाही. कुठली रिक्षा कुठली गाडी कोणीही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो नाही. सरकारचेच आभार त्यांच्या एकशे आठ च्या गाडीतून ती महिला सात वर्षाची मुलगी आणि तीन वर्षाचा मुलगा त्यांना एकटं खोलीत डांबून तालुक्याच्या ठिकाणी पोहोचली. पण त्या वेळात इकडे त्या लहानग्यांचे काय? त्या मातच्या जीवाची कालवाकालव कुणाला कशी दिसली नाही? घरी परत येईपर्यंत त्या जीवाची घालमेल, मनस्थिती काय झाले असेल.? आपण इतके पाषाणहृदयी झालो काय? क्वारंटाईनला अस्पृश्यतेची झालंर लागल्यागत झाले आहे. खरंच ही आधुनिक काळातील मानसिक अस्पृश्यता म्हणावी लागेल.

क्वारंटाईन म्हणजे “अस्पृश्य” शापित”अशी भावना आज कोरोना झालेल्या व्यक्तीसाठी निर्माण झाल्याचे चित्र आहे. महिनाभरात योग्य उपचारांनी बरा होता येतं. या रोगामुळे कॅन्सर एड्स टीबी सारख्या दुर्धर रोगाने भोगाव्या लागणाऱ्या यातनेपेक्षा भयंकर आहेत. रोग्याला आधार देऊन भेदभाव न करणं. तर बाजूलाच राहिलं उलटपक्षी त्या रोग्याचे जगणं मुश्किल होतंय की काय असं चित्रं निर्माण झालंय. क्वारंटाईन रोगी झालाय की समोरच्या माणसांतील माणुसकी? अशा समाजात मात्र जनजागृतीची, समुपदेशनाची खरी गरज आहे. आता तर याचाही विचार करणे गरजेचे आहे जर माणुसकीच अशी क्वारंटाईन झाली तर या मानवी जीवनमूल्यांच्या अस्तित्वाला मनुष्यप्राणी मुकेल. आणि भविष्य असेल ते निरस, उजाड, मुजोर, दिशाहीन.. म्हणून ह्या क्वारंटाईन झालेल्या “माणुसकीला” मुक्त करा जगा आणि जगू द्या..

संदीप पाडळकर, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *