विशेष लेख : तर अशाप्रकारे आपण सगळे सुखरूप आहोत…जगबुडी आलीच नाही..!

हेचि थोर भक्ति आवडते देवा l संकल्पावी माया संसाराची ll १ ll
ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll २ ll

” चित्ती असो द्यावे समाधान ” या उक्तप्रमाणे हे चित्ताचे समाधान करण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न मी तरी याच वर्षी केला. संसाराची माया ही निष्ठेने सोडवावी लागते, त्यात अनेक संकल्प सिद्धीस नेणे फार महत्त्वाचे ठरते बरं! तसे संकल्प प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला फार दणक्यात येत असतात.

वर्ष २०२०, तर दरवर्षीप्रमाणेच अनेक नवे संकल्प सोडले, जे फक्त सोडण्यासाठीच धरले होते. “ठेविले अनंते तैसेचि रहावे” या ओवीला अनुसरून माझं म्हणालं तर, मी या वर्षाच्या सुरुवातीलाच होती ती नोकरीही सोडली कारण काही वेळा कंटाळा येतो कागदी घोडे नाचवून कामं करायला, त्यामुळे अगदी रिलॅक्स होऊन जावं म्हटलं आणि काम सुरू केलं ते पुढच्या शिक्षणाचं! हो / नाही असे करता करता पी. एच. डी चा फॉर्म भरला. काव्यलेखन तर चालूच असतं निरंतर जणू काही श्वास असल्यासारखं…! पण प्राप्त परिस्थितीनुसार आपलेच श्वास कधी कधी खूप अस्वस्थ करतात तर कधी फुलारुन येतात तर कधीतरी अडखळत राहतात. वस्तुतः लिखाण म्हणजे श्वासांचा गोफ.

जो या गोफात अडकला त्याला गुंतण्याची सवय लागते. त्यात एक एक मणी हा अनुभवाचा असतो. तसे काही अनुभव चिंतन करायला लावणारे; तर काही ठिकाणी ते भावनीक होणारे असतात. अनेकदा आपण भावनेच्या भरात वाहत जात असतो, म्हणजे बघा की आपण प्रवासी म्हणून लोकल मधून प्रवास करावा आणि अचानक झोप लागावी अन् मग जेव्हा जाग येते तेव्हा कळतं की, आपलं स्टेशन तर मागेच राहून गेलं की ! आपल्याला चुकचुकल्यासारखे वाटते. पण मग काय ? तर पुढच्या स्टेशनला उतरून डाऊन मार्गे दुसरी ट्रेन पकडायची आणि निघायचं, या परतीच्या प्रवासात आपल्या मूर्खपणामुळे उशीर झाला ही सल कायम ठेवून! आयुष्याचा प्रवासही तसा लोकलच्या प्रवासासारखाच, इथे प्रवास वास्तविक असो की लौकिक या प्रवासात रोज अनेक स्टेशन आणि माणसं येत जात राहतात. कधीतरी बाजूच्या सीटवर अर्धा तास बसून सोबत अगदी मोकळेपणाने साथ देणारे उतरतांना येतो असंही बोलतात…तर काही एक उतरून सरळ चालते होतात, पुन्हा कधीही न दिसण्यासाठी. त्यातली काही मानवी ऋणानुबंध जपणारी पुन्हा दिसतातही पण काही जण साधी ओळखही दाखवत नाहीत. आपण स्वतः तरी कुठे इतका पुढाकार घेतो म्हणा ? शेवटी त्याचं तो जाणे आणि माझं मी! आता तुम्ही म्हणाल की, हे लोकलच गाऱ्हाणं कुठून मध्येच… तर सांगणं एकच हो, “आदमी मुसाफिर हैं…आता है_ जाता है”!

पण आपल्या आयुष्यातील ते लोकलचे प्रवासी दिवस ठप्प झाले…कोरोनाच्या आगमनाने! नकळत किंवा ज्ञानाअभावी त्यात काहींनी प्राण सोडला आणि उरलेले आपण झालो चार भिंतीत कैद! तरीही जगणं थांबलं नाही पण प्रवास मात्र थांबला. मग या घरातल्या चार भिंतीत असणारी सृजनशीलता बोलकी झाली, नवे नवे ट्रेण्ड आले, जागतिक गप्पा झाल्या, कोविडच्या येण्याचा सोहळा “याची देही याची डोळा” पाहिला. जीवघेणा वाटला, संवेदनशील मन तडफडलं पण दुसरीकडे अनेक कोरडवाहू जमिनीला कोंभ फुटले. कुठेतरी खून, दरोडे आणि राजकारणाच्या चर्चाही रंगल्या आणि कुठेतरी नुसती शाब्दिक चकमक झाली. साऱ्या आसवांचा आणि हास्याचा पाऊस बरसत गेला. आपण फक्त बघे झालो…! कधी तरी प्राप्त स्थितीवर बोललो तर कधी नकोच! म्हणून मागेही आलो. कोणी नकाराच्या घोषणा दिल्या तर कोणी प्रेमाच्या, खरं तर दोघांनाही एकमेकांचं वावडं होतं पण तरीही आपण आपले सवते सुभे राखून आपली शान जपली. चांगल्या आणि वाईटमध्ये विभागले गेलो. म्हणजे मी चांगला तो वाईट…दोन्ही भूमिका व्यक्ती सापेक्ष आहेत हो.

त्यात काही तर पार गोंधळून गेले माझ्यासारखे! आम्हांला या विचारांच्या वादळांचं गणितच समजलं नाही बरं! त्यात काही लोक उगीच रुसून बसली… काही मोकळेपणाने साथही देऊ लागली. काहींनी अगदी डोक्याचं दही बनवलं आणि काहीं जण गूढ होऊन गेलीत, असे “एक ना धड भाराभर किस्से!” अंतिमतः त्यातून आपलं जगणं समृद्ध होत आहे हे महत्त्वाचं! एकेक विचारांचे संदर्भ मनात आणि चिंतनात येत-जात राहणे म्हणजे जिवंतपणाचं लक्षण बरं का!

पण काही घटनांचं खूपच वाईट वाटलं “आपले २० जवान शहीद झाले तेव्हा!” थोर उपकार त्यांचे आपल्यावर जे बोलण्याच्या पलीकडे आहेत, शतशः प्रणाम! त्यानंतर चिनी फुसक्या तोट्यांचा बहिष्कार आपण जागृत केला; पण या चिनी व्हायरसच्या अहांकारापायी लढाईत कामी आलेल्या आमच्या शहिदांच्या घरातला आसवांचा पाऊस न जाने कित्येक वर्ष इथे बरसत राहील! त्या घरातली प्रत्येक माऊली आपलं घरं सांभाळेल, स्वतःला सांभाळेल आणि मजबूत सुध्दा होईलच! हेच आपले गृहितक आहे कारण कसं आहे ना की, माणूस कुठून ना कुठून सुखाचे नाही पण जगण्याचे कारण शोधतोच! हाच माणसाचा मोठा बुद्ध्यांक आहे हो!

तीच बुद्धिमत्ता शेवटी मला हेच सांगते की, कोरोना अजुनही तग धरून आहे बरं का बाहेर! त्याच्यावर मात करण्याच्या सुविधा आणि सुरक्षा जाणून; आपण त्याला हास्य विनोद करून आपल्या जगण्यातून हाकलून देण्याचा प्रयत्न करतो आहोत म्हणूनच की काय, आपल्याला जगायला सुरुवात करायला लावणारा हा एक नवा जगबुडीचा ट्रेण्ड आलाय असे मला वाटते. तर जग बुडणार आहे असे म्हणून जगून घ्या…हसून घ्या, लेवूण घ्या, खाऊन घ्या….जमलं तर मन दुखवून गेलेल्या एखाद्याला आठवूनही घ्या. पण मनात काही साठवून ठेवू नका आणि मनातलं दुःख स्वत:जवळ सुध्दा बोलता येणार नाही इतकं कठीण करून घेऊ नका. जगण्याचं कारणं शोधण्यापेक्षा जगण्याचं निमित्त शोधूयात. मुळात सगळ्यात मोठं तत्वज्ञान कोणतं ? तर “जगा आणि जगू द्या!”

 आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळ,  तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें 

– ज्योती हनुमंत भारती, कल्याण 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *