विशेष लेख – हे एकवीस दिवस


रेडिओ , टी वी , व्हाट्सएप , फेसबुक सगळीकडे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेचे धडे वेगाने फैलावत होते. मी सकाळी किचनमध्ये शिरल्या शिरल्या फ्रिजमधली दूधपिशवी म्हणजे टेट्रापॅक बाहेर काढली , पातेलं नेहमीप्रमाणे नळाखाली स्वच्छ धुवून घेतलं. आता दूधपिशवी नळाखाली धरायची.. पण अचानक हात सोपबॉक्सकडे गेला. साबणाने चक्क ती पिशवी सगळीकडून घासून घेतली. कोपरे, सील केलेल्या कडा अगदी काळजीपूर्वक स्वच्छ करून नळाखाली धरली. नीट धुवून झाल्याची खात्री केली आणि जवळच असलेली कात्री हातात घेतली. पुन्हा काय झालं कुणास ठाऊक कात्रीच्या पात्याना साबण लावून नळाखाली आंघोळ घातली. आता दूधपिशवीच एक टोक अलगद कापून दूध पातेल्यात ओतले.. हुश्श ! पातेलं गॅसवर ठेवलं.

आज किचनमध्ये काम करताना प्रत्येकवेळी मन म्हणत होतं हे धुवून घ्यावं का ? ते सेफ असेल का ? दारावरची बेल वाजली की दार उघडून लगेच हात धुण्यासाठी बेसिनकडे धाव घेतली जात होती. बाहेरून आलेल्या प्रत्येकाला आधी हातपाय चेहरा स्वच्छ करून मगच बसायला सांगितले जात होते. आलेल्या पाहुण्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला जात होता तर शेकहँड करणाऱ्या मुलामाणसांना नमस्काराचा आग्रह केला जात होता. किचन मध्ये काम करताना प्रत्येक छोट्या मोठया कामानंतर हात धुतले जात होते. प्रत्येक वस्तू जातीनं धुवून घेतली जात होती. सगळं काळजीपूर्वक आणि आठवणीत ठेवून करताना एकच गोष्ट मनात येत होती, ती म्हणजे आपल्याला या साध्या साध्या गोष्टी शिकवायला निसर्गाला एवढी मोठी काठी का उगारावी लागली ?

खरं तर स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून चालतात, हे सर्वमान्य आहे. दैनंदिन जीवनात आपण जमेल तेवढी स्वच्छता करतोच. मात्र जिथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते तिथे वारंवार हात धुण्याचा सल्ला कसा पचनी पडेल ? जिथे दहा बाय दहाच्या घरात पाच सहा माणसे रहात असतील तिथे एक मीटरचे अंतर कसे ठेवले जाईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

पूर्वी मुंबईमध्ये भल्या पहाटे दुधकेंद्रांवर मुंबईकरांच्या रांगा लागायच्या. आरे डेअरीच्या हवाबंद काचेच्या बाटल्यांमधून होल आणि टोण्ड असे दोन प्रकारचे दूध मिळत असे.. दूध बाटली घरी आणल्यावर ती साबणाने स्वच्छ करून मगच ओपनरने बिल्ला काढून सिल्वर पेपरचे सील काढले जाई. मग दूध पातेल्यात ओतून गॅसवर ठेवले जाई. रिकामी बाटली परत दुसऱ्या दिवशी सकाळी दुधकेंद्रांवर द्यायची असे. मला आठवत माझ्या सासूबाई ती रिकामी बाटली देखील साबणाच्या पाण्याने, अगदी ब्रश वापरून स्वच्छ करीत असत. कारण तो ‘ युज अँड थ्रो ‘ चा जमाना नव्हता आणि दुसरं म्हणजे स्वयंशिस्त , कृतज्ञता , स्वच्छता आणि सामाजीक कर्तव्यभावना हे सगळे संस्कार कोणत्याही वर्गात न शिकवता रुजलेले होते. नंतरच्या काळात दूधपिशव्या आल्या. पण आमच्या घरी काडीचाही फरक न पडता तीच कृती आणि तोच क्रम सुरू होता. फक्त पिशव्या दुधकेंद्रांवर परत घेतल्या जात नव्हत्या. त्या पुसून कोरड्या करून घरगुती वापरासाठी, पॅकिंगसाठी वापरल्या जायच्या.

किचन मध्ये हात पुसण्यासाठी वेगळा कपडा , ओटा पुसण्यासाठी वेगळा कपडा , गॅस शेगडी पुसण्यासाठी वेगळा कपडा असायचा. असे कित्येक कपड्याचे तुकडे दररोज सकाळी गरम पाण्यात डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून ब्रशने घासून घासून स्वछ धुऊन वाळवायचे. जीर्ण होईपर्यंत हाच शिरस्ता चाले. पण शेवटपर्यंत ते कपडे आणि बाहेर वापरायचे हातरुमाल यांत कोणत्याही प्रकारचा फरक केला जात नसे. म्हणूनच त्यांना सफाईची फडकी म्हटले जाऊ शकत नव्हती.  ही आज अतिशयोक्ती वाटेल , पण हे सत्य आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की ती त्यांच्या स्वभावात असलेली मूल्ये होती , रुजलेले संस्कार होते. पण थोड्याफार फरकाने त्या पिढीतील सगळ्यांचे असेच होते. सगळं निगुतीनं करायची ही मंडळी.. ना कसला कंटाळा ना कसला आळस..

माझी आजी नेहमी म्हणायची , देवाने माणसाला पृथ्वीवर पाठवताना बजावून सांगितले होते , ‘ पृथ्वीवर गेल्यानंतर दररोज दिवसातून तीन वेळा आंघोळ कर आणि एकवेळ जेव. म्हणजे तुला सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभेल. ‘ पण माणूस इतका धांदरट कि पृथ्वीवर येईपर्यंत देवाने सांगितलेले विसरून गेला आणि नेमके उलट करू लागला. एकदा अंघोळ आणि तीनदा जेवण ! तिथूनच सगळे चक्र उलट फिरू लागले. यात परमेश्वराचा दोष नसून मानवजातीचा आहे. जे काही घडतं त्याला जबाबदार आपणच म्हणजे माणसेच असतो. जसा आता कोरोना आलाय तशी अनेक संकटे यापूर्वीही आली , विध्वंस करून गेली. मात्र टिकून राहिली ती शाश्वत मूल्ये ! जी आम्हाला आमच्या इतिहासाकडून मिळाली आहेत. जी अलीकडच्या काळात आम्ही विसरत चाललो आहोत. कदाचित हा योगायोग असेल , आम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी निसर्गाने घडवलेला. पुन्हा एकदा मागे वळून पाहण्याची , माणूस म्हणून एका समान पातळीवर येऊन विचार करण्याची संधी असेल. आपण आता तरी विचार करायलाच हवा , स्वतःसाठी आणि सगळ्यांसाठी ! स्वच्छता आणि सामाजिक अंतर ठेवून आलेल्या संकटावर मात करायलाच हवी . त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेऊया, आलेल्या संकटाला परतवून लावूया..

– सौ. नूतन बांदेकर , ठाणे



1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *