विशेष लेख – ‘आम्ही खरंच चुकत होतो.’गेल्या महिनाभरापासून सारा देश लॉकडाऊन होऊन अनिच्छेने का होईना पण घरात बसलाय. कोरोनाच महाभयंकर संकट दारात आ वासून उभ आहे. कुणाला नोकरीची , नोकरी पक्की असणाऱ्याला पगाराची, शेतकऱ्याला पिकवण्याची, पिकवणाऱ्याला विकण्याची, विकणाऱ्याला उधारीची ,उधारीवाल्याला पोटाची चिंता.. सगळे जग चिंतेत बुडालय.. पण किती ही चिंता असली तरी आपण सगळे घरात बसलोय. असं सगळं असलं तरी या 30 दिवसाच्या थांबण्यात हे धावणारे जग वाहते होईल अशी आशा निर्माण झालीय..

आठवूनसुदधा आठवतच नाही इतके दिवस आम्ही कधीच स्वस्थ बसलो नव्हतो.. पद, पैसा, प्रतिष्ठा यापलीकडे निसर्ग,कुटुंब ,नाती इत्यादी जगण्याचे संदर्भचं आम्ही विसरलो होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

गेल्या महिनाभरात नेमकं काय घडलं?
महाकाय विश्व चालवणाऱ्याच अस्तित्वही नाकारणाऱ्या पासून ते मोठ्या मोठ्या संत-महंता पर्यंत सगळ्यांना एका न दिसणाऱ्या मानवी केसाच्या आठशेवा भाग इतका आकार असणाऱ्या एका अदृश्य विषाणूशक्तीने घरी बसवलं.. ज्या निसर्ग शक्तीच्या जोरावर विज्ञानाच्या साह्याने माणूस जग मिठीत घेण्याचा प्रयत्न करत होता ते हे जग निसर्गाच्या पायाजवळ शांतपणे बसलय.. ज्या तेल ओरबडण्यासाठी सगळ्या महासत्ता आकाश पाताळ एक करत होत्या तेच तेल फुकट घ्यायला आज एकही देश तयार नाही.

या जागतिक संदर्भ पासून ‘गावाकडच्या लोकांना काही कळत नाही ‘असं म्हणणारी तथाकथित सुशिक्षित सून शेताच्या बांधावर बसलेल्या सासू-सासर्‍यांची सेवा करतेय.. औद्योगिक प्रगतीमुळे केवळ नद्या काळवंडल्या नव्हत्या तर आर्थिक प्रगतीने माणसांची मनही खंगली होती. गेल्या अनेक दिवसांपासून जशा नद्या स्वच्छ होत आहेत तशी खंगलेली मनसुद्धा संवादातून जिवंतपणा अनुभवताहेत. दुकानातून किराणा आणणे सुद्धा मर्दपणाचा अपमान समजणारा पुरुष वर्षानुवर्ष लॉकडाऊन चे दुखणं अनुभवणाऱ्या माय भगिनींच्या दुःखात सामील होत दिवसंदिवस स्वयंपाक घरात राबतोय. नाचण्याला जगन समजणारी तरुण पिढी वाचायला शिकतेय. पैसा हा छंद असं समजणारा माणूस छान चित्र काढतोय बासरी वाजवतोय. चटपटीत व बटबटीत जाहिरातीच्या माध्यमातून आमच्या जीवनात आलेल्या अनेक निरुपयोगी गोष्टींचा निरर्थक पणा समोर आला आणि अन्न वस्त्र निवारा व लोप पावत चाललेला निर्मळ मनाचा संवाद याशिवाय काहीच जीवनावश्यक नसतं हे पदोपदी जाणवायला लागले.

प्रशासन फक्त पाट्या टाकणारे नसतं तर प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर धावणारही असतं हेही जाणवलं. अधिकाधिक गढूळ होत चाललेले राजकारण मात्र अलाहिदा. अनेक तज्ञ सांगताय , हवा स्वच्छ झाली, निसर्ग समृद्ध होतोय, इतर आजारांचे प्रमाण कमी होतेय, आत्महत्या, चोरी इत्यादी अपराध कमी होत आहेत.. मात्र हे सगळं होत असताना या सगळ्यांच्या मुळाशी अधाशी मनुष्य होता हे मान्य करून आता बदलाव लागेल.. मंदिरांच्या सोबत वाचनालय , रुग्णालये उभारावी लागतील. शासनाच्या सोबतीने प्रशासनाच्या पाठीशी उभे राहावे लागेल, माती सोबत नाती जपावी लागतील, एकमेकांच्या लावालावी व पाडापाडी पेक्षा झाडे लावावी लागतील ,पाणी अडवाव लागेल, शहरांच्या समृद्धी सोबत गावचं गाव पण जपावे लागेल. आज उद्या एक दिवस लॉकडाऊन संपेल, पुन्हा लोक बाहेर पडतील, शहर पुन्हा हसतील, रस्ते पुन्हा सजतील, मात्र आता परत गावं ओसाड पडू नये, माणूसपणाचा ओलावा संपू नये एवढीच अपेक्षा…

– विकास नवाळे (लेखक हे भडगावं नगरपालिका, जळगांव येेथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत तसेेच उत्तम वक्ते देखील आहेत.)


3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *