विशेष लेख : ओबीसी चळवळी आहेतच कुठे..?

स्पष्ट दिशा आणि ध्येय नसेल तर तुम्ही एकटे असा की कळपाने, काहीही फरक पडत नाही. या कसोटीवर ओबीसींच्या नावाने जे काही सुरू असते, त्याला ओबीसी चळवळ म्हणता येईल का ? याचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे. व्यावहारिक, राजकीय आकलन नसल्यामुळे बहुतेक ओबीसी / बहुजन चळवळी नुसत्या ‘पुरूषांचे हळदीकुंकू’ अशा स्वरूपाच्या झालेल्या आहेत.

ओबीसी, बहुजन महापुरुषांच्या नावाची माळ जपायची, त्यांनी काय काय केलं याची कहाणी प्रत्येकानं घोटून घोटून सांगायची, आपलं पांडित्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा, पण आपण त्यातून समाजाच्या मुक्तीसाठी काय धडा घेतला आहे, याचा मात्र पत्ता नाही ! ( अर्थात अभ्यास, समीक्षा अशा गोष्टींना महत्त्व आहेच ! ते नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण अभ्यास वेगळा आणि चळवळ वेगळी, याचं विवेकी भान आपल्याला असायला हवं. अभ्यास म्हणजेच चळवळ अशा प्रकारचा भ्रम अलीकडे सर्रास धुमाकूळ घालतो आहे. तलवारी तयार करणं आणि प्रत्यक्ष लढाई लढणं, ह्यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे ) अमक्यां उच्चवर्णीयांनी आपल्याला कसं लुटलं, तमक्यानं समूहानं आम्हाला किती वर्ष मूर्ख बनवलं आणि म्हणून आम्ही कसे मागे आहोत, याचंच रडगाणं पुन्हा पुन्हा गायचं, आणि आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्याच्या माथी मारून आपण मोकळं व्हायचं, ह्याला चळवळ म्हणता येईल का ? परिवर्तनवादी महापुरुषांची चरित्रं म्हणजे काय सत्यनारायणाची कथा आहे की संतोषी मातेचं व्रत ? नुसती कथा सांगितली, वाचली, ऐकली की पुण्य पदरी पडलं ? आमचं काम आटोपलं ?

आता देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे उलटून गेली आहेत. देशात निदान तांत्रिक दृष्ट्यातरी अजूनही लोकशाही अस्तित्वात आहे. मग ८५% बहुजन किंवा ६० टक्के ओबीसी असून आपण काय करत आहोत ? आपले ओबीसी नेते जर बेईमान आहेत, तरी त्यांचे जोडे चळवळीच्या नावानं आपण का उचलत आहोत ? आपल्याच स्टेजवर बोलावून समाजाच्या पैशानं त्यांचे सत्कार कशासाठी करत आहोत ? त्यांच्या गळ्यात हार कशासाठी घालत आहोत ? की पैसाच त्या नेत्यांकडून आणलेला असतो ? म्हणजे आपणही त्यांचीच सुपारी घेवून समाजाला मूर्ख बनवत आहोत का ?

काँग्रेस असो की भाजपा, हे दोन्ही प्रमुख पक्ष ओबीसी विरोधी आहेत. दोघांनीही ओबिसीला आरक्षण दिलं नाही. उलट वी. पी. सिंग यांनी दिलेलं आरक्षण कमी केलं. भाजपा हा पक्ष तर ओबीसींचा खरा दुश्मन आहे. तरीही ओबीसीचे लोक त्यांचे गुलाम आहेत. तेच पुन्हा इकडे येऊन ओबीसींच्या नावानं गळे काढतात. ही नौटंकी आता बंद झाली पाहिजे. समाजानंही बंद केली पाहिजे. काँग्रेस आणि भाजपा पासून ओबीसी, मागासवर्गीय लोकांनी दूर झालं पाहिजे. स्वतःचा नवा राजकीय पर्याय उभा केला पाहिजे.

स्पष्टच बोलायचं झालं, तर इकडे ओबीसी ओबीसी करायचं आणि भाजपाच्या नेत्यांना आपल्या स्टेजवर पाहुणे म्हणून बोलवायचं, ही शुद्ध बनवाबनवी आहे. असं करणारे लोक ओबिसीचे खरे दुश्मन आहेत. समाजाच्या नावावर ते त्यांची दुकानदारी चालवत आहेत, हे आपण समजून घ्यायला हवं. ती त्यांची मजबूरी असेल. पण शहाण्या माणसानं अशा लोकापासून सावध राहायला हवं. त्यांच्यापासून दूर राहायला हवं. जोपर्यंत अशा ओबीसीद्रोही आणि दलाल लोकांना राजकीय दृष्ट्या आपण वाळीत टाकत नाही, तोपर्यंत ओबीसी चळवळीला आणि समाजाला काहीही भवितव्य नाही, एवढं लक्षात असू द्या.

आणखी एक, ‘राजकारण फार वाईट आहे, त्यापासून दूर रहा’ असा कांगावा करणाऱ्या कोणत्याही चळवळी अतिशय बाळबोध किंवा अपरिपक्व आहेत, हे समजून घ्या. राजकारण ही व्यवस्था आहे. तिचा वापर करणं आपल्या हातात आहे. चाव्या योग्य माणसाच्या हातात देणं, हे आपलं काम आहे. चोराला निवडून द्यायचं आणि त्यानं इमानदारीनं काम करावं अशी अपेक्षा करायची, ह्यासारखा विनोद म्हणा किंवा मूर्खपणा म्हणा दुसरा नाही. तो आपण पुन्हा पुन्हा का करत आहोत ? चांगले लोक समाजात भरपूर आहेत. चांगले तरुण, महिला यांच्या पाठीशी उभे राहायला शिका. त्यांच्यातून उद्याचं नेतृत्व आपल्याला उभं करावं लागेल. अशा लोकांना हिम्मत दाखवायला शिका. धीर धरायला शिका. लढायला शिका. समाजासाठी त्याग करायला शिका. खिशातून दोन पैसे खर्च करायला शिका. निवडणूक आली की घोटभर दारू आणि कोंबड्यासाठी विकले जाऊ नका. कुणाचीही वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करा.

सर्वांनी प्रत्यक्ष राजकारणात सहभागी झालंच पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. पण ओबीसी विरोधकांना, ओबीसी विरोधी पक्षांना कुठल्याही परिस्थितीत मतदान करणार नाही, अशी शपथ मात्र तुम्हाला घ्यावीच लागेल. ठाम निर्धार करावा लागेल. त्या पक्षातील नेत्यांना पाहुणे म्हणून बोलावणार नाही, त्यांच्या सोबत फोटो काढणार नाही, हे प्रामाणिक पणे ठरवावे लागेल ! जे तसं करतील त्यांना साथ देणार नाही, हेही ठरवावं लागेल. तसं इमानदारीनं वागावं लागेल. हे मनापासून करा, कुणाचीही जबरदस्ती म्हणून नव्हे. कुणावर उपकार म्हणून नव्हे. स्वतःची जबाबदारी म्हणून हे करा !

…अन्यथा, उगाच चळवळीचा आव न आणलेला बरा !

तूर्तास एवढंच..

– ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर अभियान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *