लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय आरोप प्रत्यारोप आणि विधानांच पीक अगदी काँग्रेस गवतासारखं बेफाम उगवतं आहे . प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेता आपल्याला फायदेशीर ठरेल अस मत व्यक्त करून मतदारांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत आहे तर विरोधक देखील त्याला तोडीस तोड उत्तर देत राजकीय कलगीतुऱ्याचे नवे कोरे अंक जनतेसमोर सादर करत आहेत……
बारामती लोकसभा निवडणुकी संदर्भात प्रश्न केला असता बारामती लोकसभेच्या सलग तीन वेळा खासदार असलेल्या, शरदचंद्र जी पवार यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांनी संस्कारांचा दाखला देत भावनिक आवाहन केले….. नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे वाचूयात….
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप कडे देण्यासाठी उमेदवार देखील नाही तरी त्यांना ही जागा लढवायची आहे. आमचं घर फोडून आमच्याच घरातील एक महिला त्यांना उभी करावी लागते यातच सर्व आलं. माझ्यावर झालेले संस्कार सांगतात की मोठी वहिनी ही माऊली असते. अशा आईस्वरूप वहिनीला आज माझ्या विरोधात उभं केलं जातं आहे
सुप्रिया सुळे-महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा उमेदवार
वास्तविक राजकारण पाहता घरातूनच बंडखोरी अथवा राजकीय विरोध महाराष्ट्राला नवीन नाही . बीड मध्ये मुंडे बंधू भगिनी….साताऱ्यात भाऊ विरुद्ध भाऊ…बीड मध्येच काका विरुद्ध पुतण्या…असे अनेक राजकीय संघर्ष महाराष्ट्राने पाहिले आहेत. दैवी योगायोग असा की या सर्व गृहकलहात कारणीभूत म्हणून दबक्या आवाजात महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या नावाची चर्चा होते . त्याच नेत्याच्या दाराशी आता हा गृहकलह येऊन ठेपला यात कर्मचक्र पूर्ण झाल्याचे काही राजकीय जाणकार सांगतात .
संस्कारांची ग्वाही देऊन आपण एक चपखल भावनिक साद घातली आहे असे सुप्रियाताईंना वाटत असले तरी शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी प्रत्युत्तर देऊन ताईंची काळजी वाढवली आहे. नेमकं काय म्हणाले संजय शिरसाठ वाचूया…
मोठी वहिनी आईसमान असते अस सुप्रिया ताई म्हणाल्या ते योग्यच आहे . सुप्रिया ताईंनी आईचा सन्मान करावा , त्यांना निवडून आणावं आणि विजयाची भेट द्यावी. आपल्या मधील मतभेद राजकारणामुळे होत असले तरी तुम्ही एक संस्कार पाळणारी मुलगी आहात हे दाखवून द्या. सन्माननीय अजितदादा आणि सुनेत्रा वहिनींना विजयाची भेट द्या
संजय शिरसाठ – ज्येष्ठ शिवसेना नेते
आता संजय शिरसाठ यांना सुप्रियाताई सुळे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच सुप्रिया ताई राजकारण शिरसावंद्य मानणार की संस्कार जपत मोठ्या वहिनीला विजयाची भेट देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे