टाटांचा कोरोना काळात दिलासा , ४० हजार फ्रेशर्स ना देणार नोकरी..!

| नवी दिल्ली | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ब-याच कंपन्यांनी कर्मचा-यांना नारळ दिला आहे, तर काही कंपन्यांनी कर्मचा-यांच्या पगारात मोठी कपात केली आहे. अशा संकटाच्या काळातही काही कंपन्या मात्र बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने कोरोनाच्या संकटातही कर्मचा-यांना दिलासा दिला आहे. टीसीएसने देशभरातील कॅम्पसमधील ४० हजार फ्रेशर्सना नोक-या देण्याची घोषणा केली आहे.

गेल्या वर्षीही कंपनीने मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सना नोक-या दिल्या होत्या. कोरोनाच्या संकटातही टीसीएसने भरती काढल्याने ती महत्त्वाची आहे. आर्थिक संकटाचा सामना करणा-या ब-याच कंपन्या एक तर कर्मचा-यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत, तर काही कंपन्या कर्मचा-यांच्या पगारात कपात करत आहे, पण टीसीएसने यापैकी काहीही केलेले नसून उलट ती नव्या भरती करत आहे.

एवढेच नव्हे, तर टीसीएसने अमेरिकेतील कॅम्पस प्लॅटमेंट्स यंदा दुप्पट नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी नुकतेच सांगितले की, मागणीतील सकारात्मक वातावरण लक्षात घेता कंपनी हळुहळू रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात करीत आहोत.

कोरोनाच्या अनिश्चिततेमुळे ते थांबविण्यात आले होते, परंतु आम्ही आमच्या सर्व योजनांचे पालन करण्यास कटिबद्ध आहोत. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकड्यांनुसार टीसीएसचा नफा एप्रिल ते जून या तिमाहीत १३ टक्क्यांनी घसरून अवघ्या ७,०४९ कोटी रुपयांवर आला आहे. हे कोरोनाच्या संकटामुळे झालेले नुकसान आहे. परंतु टाटा संबंधित कंपन्यांनी नेहमी ग्राहक हितासोबत कर्मचारी हिताला देखील प्राधान्य दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *