एक शरद, सगळे गारद..! संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीचा टीझर रिलीज.!

| मुंबई | राज्यातील इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हटलं जातं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे सरकार सत्तेत आल्याचंही अनेक वेळा बोललं जात. आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची एक मुलाखत घेतली आहे. सामना या वृत्तपत्रात ही मुलाखत प्रकाशित होणार आहे. दरम्यान त्यांनी नुकताच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला आहे.

एक शरद, सगळे गारद…!अश्या मथळ्याखाली संजय राऊतांनी ट्विटवर मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला. ही मुलाखत तीन भागांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. यासोबतच या मुलाखतीचा पहिला भाग ११ जुलै रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे. यासोबतच त्यानंतर १२ आणि १३ जुलै रोजी या मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भागही पाहायला मिळणार आहे.

या टीझरमध्ये संजय राऊत अनेक मुद्द्यांना हात घालताना दिसत आहे. कोरोनापासून तर सरकार स्थापनेपर्यंत, तसंच राममंदिराशी संबंधित प्रश्नांना शरद पवार हे उत्तर देत असल्याचं या टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. या सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचंही बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ही मुलाखत महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *