सरकारच प्रशासनात मराठी सक्तीचे करण्याचा निर्णय उत्तम – कौतिकराव ठाले पाटील

| पुणे | शासकीय कामकाजात मराठी भाषेची सक्ती करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘काँग्रेसच्या लाचारीमुळं मराठी भाषेचं बरंच नुकसान झालं आहे. शरद पवारांनी शिवसेनेबरोबर सरकार घडवून आणलं ते एका अर्थानं बरंच झालं,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

मंत्रालयापासून ते जिल्हा परिषदांपर्यंत सर्वच स्तरांवरील सरकारी कामकाजात मराठीचाच वापर झाला पाहिजे, असा आदेश ठाकरे सरकारनं जारी केला आहे. हा आदेश न पाळणाऱ्यांची पगारवाढ रोखण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. कौतिकराव ठाले-पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ‘मराठीच्या बाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयाला खरंतर उशीर झाला आहे. पण उशिरा का होईना ते झाले आहे. मराठी भाषा मंत्रिपद शिवसेनेकडं असल्यामुळं हे झालं,’ असं ते म्हणाले.

ठाले-पाटील यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. ‘मराठी भाषेच्या सक्तीबाबत यापूर्वी अनेकदा मागणी करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसनं काही केलं नाही, टाळत गेले. ते परप्रांतीयांना विशेषत: हिंदी भाषकांना व दिल्लीच्या त्यांच्या श्रेष्ठींना घाबरत होते. त्यांच्या भित्रेपणा (किंवा लाचारी) मुळे मराठी भाषेचे आजवर बरेच नुकसान झाले आहे. शरद पवार यांनी शिवसेनेबरोबर सरकार घडवून आणल्यामुळं निदान मराठीचे प्रश्न तरी ऐरणीवर आले आहेत. मार्गी लागत आहेत,’ असंही ठाले-पाटील यांनी सांगितलं.

मराठी भाषेच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालत असल्याबद्दल ठाले-पाटील यांनी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे आभार मानले आहेत व उर्वरित कामासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.