राष्ट्रपतींनी घालून दिला आदर्श..!
वेतनात ३०% कपात, अनावश्यक खर्चालाही कात्री...!

| नवी दिल्ली | कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या स्वत:च्या पगारात ३० टक्के कपात केली असून, या साथीचा मुकाबला करण्यासाठी मदत व्हावी यासाठी अन्य प्रकारच्याही खर्चात राष्ट्रपतींनी कपात केल्याची माहिती राष्ट्रपती भवनातून देण्यात आली. 

सुरक्षित वावर राखण्यासाठी राष्ट्रपतींनी देशांतर्गत कार्यक्रम आणि दौरे कमी केले असून, त्यावरील खर्चात कपात केली आहे. तसेच राष्ट्रपती भवनात होणाऱ्या भोजन समारंभांनाही कात्री लावण्यात आली असून, येणाऱ्या पाहुण्यांच्या संख्येतही कपात केली आहे. भोजनातील अन्नपदार्थांची संख्या कमी केली आहे आणि पुष्पगुच्छ आणि अन्य सजावटीच्या वस्तूही कमी केल्या आहेत.

राष्ट्रपती कोविंद यांनी खर्चात कपात करण्यासाठी लिमोझिन खरेदीही लांबणीवर टाकली आहे. ही गाडी राष्ट्रपतींना विविध कार्यक्रमांना जाण्यासाठी वापरण्यात येते. सध्या राष्ट्रपती भवन आणि सरकारमध्ये गाडी शेअर केली जाते. भवनाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही कमी केला असून, अत्यावश्यक ठिकाणीच दुरुस्ती व देखभाल खर्च केला जाणार आहे. तसेच, यावर्षी राष्ट्रपती भवनात कोणतेही नवे काम केले जाणार नाही, केवळ सुरू असलेली कामेच पूर्ण केली जातील, असेही राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. वीज आणि इंधनाच्या खर्चातही बचत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 कोरोनाच्या काळात पैसे वाचविण्यासाठी सर्वांनी साधनसंपत्तीचा कमीत कमी वापर करावा यासाठी राष्ट्रपती कोविंद यांनी राष्ट्रपती भवनाला सूचना दिल्या असून, वाचणारे पैसे कोरोना लढ्यात आणि लोकांच्या आर्थिक स्थितीसाठी उपयोगात यावेत, असेही पत्रकात नमूद केले आहे.  भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या सरकारच्या निर्धाराला राष्ट्रपती भवनाचे हे अल्प स्वरूपातील योगदान आहे. देशाने कोरोनाचा मुकाबला आणि विकास करण्याचे आव्हान एकाचवेळी पेलावे यासाठी यातून ऊर्जा मिळेल, असेही राष्ट्रपती भवनाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *