भाजप अडचणीत आले की पवार मदतीला कसे येतात, हा प्रश्न आहे – बाळासाहेब थोरात

| मुंबई | भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा विरोध केल्याने काँग्रेस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावर  प्रतिक्रिया दिली आहे, मात्र भाजप अडचणीत आला की पवार मदतीला कसे काय धावून जातात, असा प्रश्न काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण विचारत आहेत.

चीनच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष सरकारसोबत आहे. मात्र त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये, असा होत नाही, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे. शरद पवार यांनी भारत-चीन प्रश्नावर राजकारण करण्याची ही वेळ नसल्याचे साता-यात म्हटले होते, त्यावर काँग्रेसने ही प्रतिक्रिया दिली आहे.

देशाच्या सीमा सुरक्षेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारणे हे राजकारण नाही तर जनतेने दिलेली जबाबदारी आहे. सन १९६२च्या आणि आजच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे, असे प्रदेश काँग्रेसतर्फे थोरात म्हणाले. गेल्या ४५ वर्षांत चीन सीमेवर आपला एकही जवान शहीद झाला नव्हता. गलवान खो-यात चीनच्या आगळीकीमुळे आपले २० जवान शहीद झाले आहेत.

तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही म्हणत आहेत. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या शहीदांना घुसखोर ठरवत आहे. याचे दु:ख काँग्रेसप्रमाणेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही असेलच, असे काँग्रेसने म्हटले आहे. शरद पवार काय बोलले, त्याची पूर्ण स्पष्टता नाही, मात्र त्यांच्या एखाद्या विधानावरून माध्यमांनी निष्कर्षापर्यंत पोहोचून पंतप्रधानांना क्लीन चिट आणि राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा आततायीपणा करू नये, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *