अध्याय १ : तख्तास जागा हाच गड करावा – प्रस्तावना

“ संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस्त होतो. हे राज्य तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले, त्यावरुन आक्रमण करीत करीत साल्हेरी अहिवंतापासून कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले.’’ हुकुमतपन्हा रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्रात वर्णिलेले दुर्गांचे महत्व अगदी साजेशे असे आहे.

स्वराज्याची स्थापना झाली ती देखील शत्रूंचे दुर्ग हस्तगत करून, स्वराज्य पुष्ट झाले ते शिवरायांच्या अद्वितीय दुर्गस्थापत्य शास्त्रातून घडलेल्या राजगड , प्रतापगड या सारख्या दुर्गांच्या अंगाखांद्यावर आणि आणीबाणीच्या कठीण काळात स्वराज्य तगले ते सुद्धा श्री राजा शिवछत्रपती यांनी दूरगामी विचार करून जिंकून घेतलेल्या जिंजी सारख्या दूरस्थ दुर्गांच्या आश्रयाने…! लाखोंची फौज आणि करोडोंचा खजिना घेऊन स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबास मराठ्यांनी ३०-३२ वर्षे झुंजवले आणि स्वराज्य अबाधित राखत त्या औरंगजेबाची कबर याच दख्खन च्या मातीत खणली ती देखील याच दुर्गांच्या आश्रयाने… स्वराज्य म्हणजे दुर्ग आणि दुर्ग म्हणजे स्वराज्य हे एक बेमालूम समीकरणच..

दुर्गस्थापत्यशास्त्रानुसार दुर्गांचे काही मुख्य प्रकार दिले आहेत..

 • स्थलदुर्ग अथवा भुईकोट म्हणजे जमिनीवर उघड्या मैदानात बांधलेला दुर्ग
 • जलदुर्ग म्हणजे पाण्यात असलेला दुर्ग
 • अरण्यदुर्ग म्हणजे थोड्याशा उंचीवर परंतु निबिड अरण्यात बांधलेला दुर्ग
 • गिरिदुर्ग म्हणजे उंच डोंगरावर बांधलेला दुर्ग
 • मिश्रदुर्ग म्हणजे भुईकोट आणि जलदुर्ग दोन्हींचा संगम असलेला दुर्ग उदा. कुलाबा किल्ला

दुर्गस्थापत्य अथवा दुर्गनिर्माण शास्त्र इतर बाबी सांगत असले तरी एक मराठी दुर्गप्रेमी मात्र दुर्गांचे दोनच गटात वर्गीकरण करेल..

 • शिवरायांचा पदस्पर्श लाभलेले दुर्ग
 • शिवरायांचा पदस्पर्श न लाभलेले दुर्ग

श्री राजा शिवछत्रपती यांचे जीवन चरित्र ह्या दृष्टीने देखील वेगवेगळ्या दुर्गाना वेगवेगळे महत्त्व आहे. शिवरायांच्या बाललीलांचा साक्षीदार असलेले शिवनेरी, प्रबळगड हे दुर्ग.. स्वराज्याच्या रोपट्याची रुजवणूक पाहण्याचे भाग्य लाभलेला तोरणा , शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे असंख्य अनुभव असलेला राजगड, स्वराज्यावर आलेल्या संकटात शिवरायांची पाठराखण केलेले प्रतापगड आणि पन्हाळगड… मावळ्यांच्या स्वामीनिष्ठेची साक्ष देत उभा असलेला विशाळगड… जितके दुर्ग तितक्या आठवणी.

परंतु या सर्वांमध्ये स्वराज्य मुकुटात इतरांपेक्षा किंचित जास्त चमकणारे दोन बहुमुल्य रत्ने म्हणजे राजगड आणि रायगड. दोन्ही गडांना शिवरायांचा सहवास सर्वात अधिक लाभला त्यामुळेच दुर्गप्रेमी शिवप्रेमी मावळ्यांच्या मनात या दोन दुर्गांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. त्यापैकी रायगड हि तर स्वराज्याची अभिषिक्त राजधानी.. दुर्गदुर्गेश्वर रायगड, शिवतीर्थ रायगड, राजधानी रायगड.. समस्त मराठी मनाचा मानबिंदू रायगड.. त्यामुळेच रायगडाचे महत्त्व हे वेगळेच.. शब्दात न बांधता येणारे. सुमारे चारशे वर्षांची अंधारी काळरात्र सरून वेदमंत्रांनी अभिषिक्त… छत्रपती असा राजा या महाराष्ट्र भूमीला मिळाला तो याच पुण्य रायगड भूमीवर.

चारशे वर्षांची अंधारी रात्र सरण्यास सुरुवात तर शिवनेरीवर श्री शिवाजी जन्मले त्याच वेळी झाली होती. महाबाहू शहाजीराजे भोसले आणि सकलगुण संपन्न राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या संस्कारात आणि शिकवणुकीत बाल शिवबा घडत असतानाच स्वराज्यही त्या बरोबरच वाढत होते. चारशे वर्षांची काळरात्र संपून झालेली पहाट त्यानंतरची सकाळ अनुभवण्याचे भाग्य इतर दुर्गांना आणि गावांना लाभले असेल तरी त्या रात्रीनंतर आलेली प्रखर मध्यान्ह जिचा सूर्य म्हणजे दस्तुरखुद्द श्री राजा शिवछत्रपती ते पाह्ण्याचे भाग्य इतिहासाने रायगडाच्या ललाटावर कदाचित फार आधीच कोरून ठेवले असावे. ह्या स्वराज्यसूर्याची प्रखरता इतकी ओजस्वी आणि तेजस्वी होती कि थेट दिल्लीच्या बादशाहाचे डोळे देखील त्या तेजाने दिपून गेले.

शिवरायांनी रायगडाचे आणि रायगडाने शिवरायांचे प्रथम दर्शन घेतले त्यावेळी शिवरायांच्या मुखातून निघालेले उद्गार इतिहास पुरुषाने नोंदवून ठेवले आहेत. कृष्णाजी अनंत सभासद यांनी ते उद्गार आपल्या बखरीत लिहून ठेवले ते असे “रायरीगड अदलशाही होता. तो घेतला. राजा खासा जाऊन पाहता, गड बहुत चखोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच. पर्जन्यकाळी कडीयावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु उंचीने थोटका. दौलताबादचे दशगुणी गड उंच, ऐसे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा ’’

जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या आणि पर्यायाने आदिलशाहीच्या अधिपत्याखाली असलेला रायरीचा दुर्ग स्वराज्यात आला आणि त्याचे भाग्य उजळले. जावळी काबीज केल्याने स्वराज्य देखील आधीच्यापेक्षा विस्ताराने जवळपास दुप्पट झाले आणि स्वराज्याची सीमा समुद्राला भिडली. रायरीचा डोंगर पाहिल्यानंतर जे उद्गार शिवरायांनी काढले ते उत्स्फूर्त असू शकतील पण त्या नंतर ज्या घटना घडल्या जे प्रसंग गुदरले त्यापरत्वे रायगडालाच राजधानी करावी हा विचार दृढ होत गेला असावा. शिवराय हे अष्टावधानी. त्यांच्या मनात सदैव स्वराज्य आणि स्वराज्यहित हाच विचार सुरु असावा त्यामुळे त्यांचे मनी राजधानीसाठी उपयुक्त अशा ठिकाणाची जी दृढ भावना असेल तिच्याशी रायरीचा मेळ सुयोग्य बसत असल्याने त्याची निवड त्यांनी पाहताक्षणी केली असावी कारण रायरीचा रायगड होण्याची निर्मिती प्रक्रिया सुमारे १२-१४ वर्ष सुरु होती आबाजी सोनदेव आणि हिराजी इंदुलकर यांनी शिवरायांचा संकल्पित दुर्ग वास्तवात उतरवला आणि राजगडावरून रायगडावर वास्तव्य हलविण्याची सुरुवात साधारणपणे १६७०च्या आसपास सुरु झाली जी पुढे ३-४ वर्षे सुरूच होती.

 याच दुर्गदुर्गेश्वर रायगडाची इत्यंभूत माहिती आपणासमोर ठेवण्यासाठी सदर लेखमाला सुरु करत आहोत.. सर्वसामान्य जनतेला रायगडाविषयी अपरिमित कुतूहल आहे. अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या लेखमालेच्या रूपाने आपण करणार आहोत. हि सर्व प्रेरणा तो श्री राजा शिवछत्रपती यांची आपण निमित्त मात्र.. 

“ रायगडावर खडे विखुरले शिवरायांचे पायी
तेच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही’’
हाच भाव मनी धरून आम्ही आपल्या समोर सादर होणार आहोत..

 • रायरीच्या डोंगराचा इतिहास..
 • रायरीच्या डोंगराचे भौगोलिक महत्त्व.. त्याचा विस्तार
 • शिवशंभू काळात रायगडाचे महत्व.. 
 • रायरीचा किल्ल्यावरील शिवपूर्व कालीन वास्तू..
 • रायगडाविषयी विदेशी अभ्यासकांनी काढलेले गौरवोद्गार ..
 • रायगडाचीसद्य अवस्था..

या सर्वांचा उहापोह आपण या लेखमालेत करणार आहोत.

दुर्गसेवेशी तत्पर , मावळा निरंतर, (प्रविण काळे – देशमुख, रायगड)

14 Comments

 1. खूप छान माहिती , …जय शिवराय

 2. माहिती खूप छान स्थळपरत्वे फोटो असतील तर अजून उत्तम

 3. अलौकिक अशी लेखनमाला, उत्कृष्ट शब्दरचना,आणि सुंदर साजेशी खरी माहिती..सुरू ठेव दणक्यात..

 4. लेखनशैली खूप सुंदर. माहितीही छान, वाचनीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *