राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचे क्रीडा विद्यापीठ व्हावे – खासदार माने| कोल्हापूर | कोल्हापूरात राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे क्रीडा विद्यापीठाची स्थापना करावी अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोल्हापूरात क्रीडा विद्यापीठ झाल्यास राज्यातील खेळाडूंना व क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला. त्यासंबंधी निवेदनात त्यांनी शाहू महाराज यांचे खेळावरील प्रेम व आवड याची सांगड घातली आहे.

काय आहे निवेदनात :

क्रीडा विद्यापीठ हा क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आहे. क्रीडा विद्यापीठ हे राज्यातील एक महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. क्रीडा विद्यापीठात क्रीडा सुविधांबरोबरच क्रीडा क्षेत्राला लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टींचा समावेश असणार आहे. साहजिकच खेळाडू, प्रशिक्षकांबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची असणाऱ्या युवा पिढीसाठी हे मोठे दालन ठरणार आहे. त्यामधून क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान व क्रीडा व्यवस्थापन अशा विविध विषयांचा अभ्यास करता येणार आहे. नवनवीन अभ्यासक्रम, आधुनिक क्रीडा सुविधा, रोजगाराच्या अनेक संधी क्रीडा विद्यापीठातून उपलब्ध होणार आहेत. खेळांबरोबरच विविध क्षेत्रात करिअर करण्याचीही संधी खेळाडू तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधित लोकांना मिळणार आहे. त्यामुळे राज्याचे क्रीडा विद्यापीठ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरात व्हावी अशी मागणी क्रीडाप्रेमी नागरीक व खेळाडूंच्यामधून होत आहे.

आजही देशाच्या विविध भागातील खेळाडू कोल्हापूरमध्ये सरावासाठी आहेत. कारण खेळासाठी कोल्हापूरचे हवामान चांगले आहे. उत्तम दर्जाचे दूध आणि इतरही खाद्यपदार्थ आहेत. मुबलक पाणी आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक शहरांतून दरवर्षी कुस्ती शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मल्ल या शहरात येतात. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यापासून ते अलीकडील रेश्मा मानेपर्यंत कुस्ती, फुटबॉल, जलतरण, नेमबाजी, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, रबी, तलवारबाजी, मैदानी स्पर्धा असा एकही क्रीडाप्रकार नाही, की त्यामध्ये कोल्हापूर देशातच नव्हे तर जगात चमकले नाही. त्यामुळे कोल्हापूरकरात क्रीडा विद्यापीठ झाल्यास क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळेल. तरी कोल्हापूरकरात क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करुन सहकार्य करावे ही विनंती. तसेच क्रीडा विद्यापीठाला राजर्षि शाहू महाराजांचे नाव देऊन, शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करावा ही विनंती..
– खासदार धैर्यशील माने


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *