या दोन पदार्थांवर द्या भर… संभाजी भिडे

सांगली: राज्यासह देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्यानं चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारपेक्षा अधिक आहे. तर राज्यात दोनशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कोरोनाग्रस्तांना बरं करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारनं या उपायांचा वापर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

कोरोनामुळे मृत पावलेल्या बहुतांश व्यक्ती ६५-७० वयाच्या आहेत. तरुण क्वचितच कोरोनामुळे मृत पावत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे तरुण मुलांना मैदानावर खेळायला सोडावं.
सरकारनं लागू केलेल्या बंधनांमध्ये शिथिलता आणायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. कोरोनावरील उपचारांत गोमूत्र आणि गायीचं तूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा दावादेखील त्यांनी केला. गोमूत्र, गायीचं तूप, अतितीव्र जंतूनाशकं आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना केंद्र आणि राज्य शासनानं गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असं त्यांनी सुचवलं.

कोरोनाबाधितांच्या खाण्यापिण्यात गोमूत्र, गायीच्या तुपाचा उपयोग केला जावा. त्यानं नक्कीच फरक पडेल. कोणतेही जंतू श्वासावाटे आपल्या शरीरात जात असल्याचं मी आयुर्वेदात वाचलंय. या जंतूंचा नाश करण्याचं सामर्थ्य गायीच्या तुपामध्ये आहे. बाकी कशातही इतकी शक्ती नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या नाकाला दर ३ ते ४ तासांनी तुपाचं बोट लावावं. सकाळ संध्याकाळ त्यांना गोमूत्र प्यायला द्यावं, असे उपाय त्यांनी सुचवले.

केंद्र आणि राज्य सरकार भगवंतानं दिलेल्या उपायांचा वापर आग्रहपूर्वक करत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर केला गेल्यास हे संशोधन आपण पुढल्या पिढ्यांना देऊ शकू. त्याचा त्यांना उपयोग होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असं संभाजी भिडे म्हणाले.

सांगलीतल्या इस्लामपुरमधल्या २५ जणांना अचानक कोरोनाची बाधा झाली. त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ३०७ कलम लावायला हवं. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्याच्या अंतर्गत बंदिस्त करायला हवं. राजकारण बाजूला ठेवून राष्ट्राच्या संरक्षणासाठी, लोकांची काळजी लक्षात घेऊन त्या दृष्टीनं ही कारवाई करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *