या मनसेच्या बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास..!

| औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी आज तडकाफडकी राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हीडिओ संदेशाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली. या व्हीडिओत हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासत आहे. त्यावेळी मला आपण अनेक गोष्टींसाठी विनाकारण पळापळ करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी व्हीडिओत म्हटले आहे.

मात्र,  यावेळी त्यांनी आपली पत्नी संजना जाधव ही आपली राजकीय उत्तराधिकारी असेल, हे स्पष्ट केले. त्यामुळे आता लोकांनी आपल्या अडचणी त्यांच्याकडून सोडवून घ्याव्यात, असे आवाहनही हर्षवर्धन जाधव यांनी केले.  हर्षवर्धन जाधव २००९ साली औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र, यानंतर राज ठाकरे यांच्यावर नाराज होऊन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

२०१४ मध्ये ते शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून गेले. मात्र, शिवसेनेतील नेत्यांशी खटके उडाल्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर गेल्याचवर्षी पार पडलेल्या मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनावेळी त्यांनी घरवापसी केली होती. मात्र, त्यांच्यावर कोणतीही विशेष जबाबदारी न देण्यात आल्याने ते पक्षात विशेष सक्रिय नव्हते. मनसे , सेना , अपक्ष, मनसे असे एक पूर्ण वर्तुळ त्यांनी पूर्ण केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *