वीज बिलासंबंधी घेण्यात आला ‘ हा ‘ निर्णय..!
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती..!


  • मार्च आणि एप्रिल महिन्याचं वीजबिल भरण्यास मुदतवाढ..
  • स्वतःच मीटर रीडिंग पाठवण्याचं आवाहन..
  • ज्या ग्राहकांकडे रिडींग उपलब्ध नसेल त्या ग्राहकांना मागच्या काही महिन्याच्या सरासरीनुसार ते आकारण्यात येईल.

मुंबई/ प्रतिनिधी  :  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊनच्या परिस्थितीत वीजबिलासंदर्भात मोठा निर्णय उर्जा मंत्र्यांनी घेतला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचं वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. ज्या वीजग्राहकांकडे मीटर रीडिंगची सोय आहे. त्यांनी स्वतःच मीटर रीडिंग पाठवण्याचं आवाहनही उर्जामंत्र्यांनी केलं आहे.

महावितरणच्या घरगुती, व्यापारी, व्यावसायिक आणि इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च आणि एप्रिल महिन्यांचं वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. सोबतच महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रिडींगचं वीजबिल प्राप्त होईल. ज्या ग्राहकांकडे रिडींग उपलब्ध नसेल अशा घरगुतीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सरासरी विजबिल पाठवण्यात येईल. त्यांचं बिल हे मागच्या काही महिन्याच्या सरासरीनुसार आकारण्यात येईल.

आपल्या घरातल्या विजेचं रीडिंग स्वतःच घ्यावं आणि महावितरणला या वेबसाइटवर पाठवून द्यावं, असं सांगण्यात येत आहे. महावितरणच्या कन्झ्युमर पोर्टलवरून किंवा मोबाईल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरचं रीडिंग अपलोड करण्याची सोय आहे. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन पाठवावं.

‘लॉकडाऊन’मुळे मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावं, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *