डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल – सामना

| मुंबई | प्रदेश भाजपानं ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ हाती घेतलं आहे. या आंदोलनावरून शिवसेनेनं आता विरोधकांवर निशाणा साधला आहे. “ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा, असे सांगण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही. करोनाच्या निमित्तानं राज्यात नवे प्रश्न निर्माण झाले. राज्यपालांच्या ‘अंगणात’ लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटत आहे की त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे?” असा सवाल करत शिवसेनेनं भाजपावर सामन्यातून जबरदस्त हल्लाबोल केला.

काय आहे अग्रलेखात :

प्रदेश भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ म्हणजे नेमके काय? ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा, असे सांगण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही. पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण विरोधकांत शहाणपण उरले आहे काय?

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ‘ठाकरे सरकार’विरुद्ध आंदोलन पुकारले आहे. सारा देश कोरोनाविरुद्ध लढ्यात झोकून देऊन काम करीत असताना महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत. ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ अशा प्रकारचे बारसे या आंदोलनाचे झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून या मंडळींना महाराष्ट्र वाचवायचा आहे. प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फतवा काढला आहे की, ‘राज्यातील जनतेने शुक्रवारी आपापल्या घराबाहेर पडावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा.’ चंद्रकांत पाटील व इतर अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचे केस साफ पांढरे होऊन त्यांची चांदी झाली आहे. मग आता त्या केसांना काळा कलप लावून ते अंगणातील रणांगणात उतरणार काय? कारण महाराष्ट्र भाजपचा आदेश आहे की सर्वच काळे करा. हा सर्वच प्रकार म्हणजे येडय़ांची जत्रा आहे. पाटील व त्यांचा पक्ष म्हणतोय की, महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे व हातावर पोट असणाऱयांचे खायचे वांदे झाले आहेत. श्री. पाटील यांनी महाराष्ट्र व केरळ राज्यांची तुलना करताना खदखद व्यक्त केली आहे की, कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत जे केरळला जमले ते महाराष्ट्राला का जमू शकले नाही. पाटील यांनी ‘केरळ मॉडेल’चा नीट अभ्यास केलेला दिसत नाही. केरळचे मुख्यमंत्री विजयन हे केंद्राच्या सूचना पाळत नाहीत व पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच्या व्हिडिओ बैठकांत सामील होणे म्हणजे वेळेचा अपव्यय असे मानणाऱ्यांपैकी आहेत. मोदी यांच्या बरोबरच्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसल्याने विजयन हे पंतप्रधानांच्या व्हिडिओ चर्चेत सामील होत नाहीत, असे त्यांच्या सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील व श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्रापेक्षा केरळात जाऊन ‘रणांगण’ गाजवायला हवे. महाराष्ट्राचे अंगण स्वच्छ आहे व

कोरोना योद्धे रणांगणात

लढत आहेत. देशात आरोग्यविषयक आणीबाणी आहे. महाराष्ट्र सरकार ‘केरळ मॉडेल’चा मार्ग न स्वीकारता पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्याशी समन्वय साधून काम करीत आहे, कोरोना युद्धाचे नेतृत्व पंतप्रधान मोदींकडेच आहे व राहील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. हे जर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या पचनी पडत नसेल तर त्यांनी खुशाल आंदोलन करावे. मात्र हे आंदोलन त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात ठरेल हे त्यांनी लक्षात ठेवावे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या डोक्यावर ताणतणावामुळे परिणाम झाला आहे. जनतेने त्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिले आहे व भाजपवाले काही करू किंवा बोलू लागले तर लोक त्यांना हसून विचारत आहेत की, ‘मेरे, आंगने में तुम्हारा क्या काम है?’ या सगळय़ाचे वैफल्य येणे साहजिकच आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या निमित्ताने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत व सरकार त्या प्रश्नांशी झगडत आहे हे खरेच. महाराष्ट्र राज्य हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपले वाटत असेल तर त्यांनी प्रश्न सोडविण्याच्या कामी राज्य सरकारला सहकार्य केले पाहिजे. राज्यपालांच्या ‘अंगणात’ लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटत आहे की त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे? महाराष्ट्रात कोरोना लढाईत सगळेच काम करीत आहेत. रुग्ण वाढत आहेत तसे रुग्ण कोरोनामुक्तही होत आहेत. आतापर्यंत दहा हजार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद आहे हे कसले लक्षण आहे? कोरोना योद्धय़ांवर अविश्वास दाखवून भाजपला

काय साध्य करायचे आहे?

ही वेळ लढण्याची, वाद उगाळण्याची नाही, असे पंतप्रधान मोदी यांचे सांगणे आहे, पण महाराष्ट्र भाजपचे नेमके पंतप्रधान मोदी यांच्या उलट सुरू आहे. ही कसली शिस्त म्हणायची? पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या सूचनेवरून पाटील-फडणवीस मंडळ महाराष्ट्रात स्वत:चेच तोंड काळे करण्याचे आंदोलन करीत आहेत असे वाटत नाही. ही आंदोलनाची मूळव्याध त्यांची त्यांनाच उपटलेली दिसते. प्रदेश भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ म्हणजे नेमके काय? ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा असे सांगण्याची वेळ आली आहे. पाटील-फडणवीस मंडळींनी महाराष्ट्रासंदर्भात जे प्रश्न निर्माण केले आहेत ते सर्व केंद्राशी संबंधित आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक करावे ते म्हणजे सर्वपक्षीय शिष्टमंडळ विरोधी पक्षनेत्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीस पाठवावे व त्यांच्या हाती दिल्लीहून मंजूर करून घ्यायची कामाची यादी सोपवावी. महाराष्ट्राची चिंता करणाऱ्या पाटील-फडणवीसांनी ही सर्व कामे व योजना, महाराष्ट्राच्या वाट्याचे पाच-पन्नास हजार कोटी रुपये घेऊन यावेत. महाराष्ट्राची मालकी कुणा एका-दोघा पक्षांची नाही. महाराष्ट्रात ‘काळतोंडे’ आंदोलन करण्यापेक्षा हे विधायक काम बरे. महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही. पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण विरोधकांत शहाणपण उरले आहे काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *