‘ हे ‘ आहे राजकारणाचे नवे केंद्र..!

| मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून दादर येथील महापौर बंगल्याला खूप महत्त्व प्राप्त झाले असून सरकारच्या विविध बैठका महापौर बंगल्यातच घेतल्या जात आहेत. आजवरचे मुख्यमंत्री सर्व बैठका मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा किंवा राज्य अतिथीगृह सह्याद्री येथेच घेत असत.  परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महापौर निवासस्थान हे आवडते ठिकाण असल्याने येथे बैठकांचा सिलसिला मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने सरकारच्या चर्चेचे हे नवे केंद्र तयार झाल्याचे दिसून येत आहे. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कनेक्शन:
महापौर बंगला हा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते ठिकाण होते. भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते मुंबईत आले की त्यांच्यासोबतच्या बैठका या महापौर बंगल्यातच होत असत. तसेच पक्षाच्या बैठकाही ते याच बंगल्यात घेत असत. ते रोज संध्याकाळी बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या हिरवळीवर चालण्यासही येत असत. महापौर बंगल्यात एक मजली पुरातत्व वास्तू असून बाळासाहेबांना पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी विशेषत्वाने लिफ्टची परवानगी देण्यात आली होती. लिफ्ट तयार झाल्यानंतर बाळासाहेब पहिल्या मजल्यावर जात असत. शिवाजी पार्कवरील सभा किंवा दसरा मेळाव्याला बाळासाहेब येत तेव्हा ते प्रथम महापौर बंगल्यातच जात आणि थोडा आराम करीत.

 दरम्यान दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर  बंगल्याच्या तळघरात अर्थात अंडरग्राऊड होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलिही तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून ‘ब’ दर्जा मिळालेला आहे. त्यामुळेच या वास्तूचे जतन करुन त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *