- दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल
नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजार ७१२ वर पोहोचला आहे. तर देशात आतापर्यंत ५०७ मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे २ हजार २३१ लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात १ हजार ३३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
“गेल्या 28 दिवसांत गोवा, माहे (पुदुचेरी) आणि कोडाग्गू / कुर्ग (कर्नाटक) या राज्यात कोविडचा एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही. यासोबतच, 23 राज्य/ केंद्रशासित प्रदेशांतील अन्य 54 जिल्ह्यांत गेल्या 14 दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.” हे देखील आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. म्हणजे गोवा हे राज्य पूर्णतः कोरोना मुक्त झाले आहे..
तसेच औषधे व लसींच्या चाचण्यांसंदर्भात काम करण्यासाठी एका उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. लस बनवण्याबाबत सर्व मंत्रालयांकडून सुरु असलेल्या कामामधील समन्वयाला हे कृती दल गती देईल,” असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
कोरोनावर लस विकसित करण्यासाठी 17 गट काम करत आहेत. यातील 5 गटांनी प्राण्यांवरील अभ्यासाचा टप्पा पूर्ण केला असून मानवावरील परिणाम तपासून पाहात आहेत. यातील एक ऑक्सफॉर्ड गट हा कोरोनावर लस विकसित काम करत आहे. या गटाने केलेल्या अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षांचा विचार करण्यात येईल, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.