| TRP घोटाळा | गोस्वामीच्या रिपब्लिक TV च्या अडचणीत वाढ, सीईओला अटक..!

| मुंबई | टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अडचणींत अधिक भर पडली आहे. रिपब्लिक टीव्हीशी संबंधित असलेली ही दुसरी अटक झाली आहे. रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी विकास खानचंदानी यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. रिपब्लिकसंबंधित ही दुसरी अटक असून या प्रकरणात एकूण अटक आरोपींची संख्या १३ वर पोहोचली आहे. या प्रकरणात थेट सहभाग दिसून आल्याने रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ झाली आहे, असे सांगितले जात आहे.

टेलिव्हीजन क्षेत्रातील सर्वात मोठा टीआरपी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर मुंबई पोलिसांनी अटकसत्र सुरू ठेवले आहे. याआधी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे वितरण विभागाचे प्रमुख घनश्याम सिंग यांना ठाण्यातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात थेट सहभाग आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

टीआरपी घोटाळ्यामध्ये आतापर्यंत सुमारे ४६ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. १३ आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. दरम्यान महामूव्ही वाहिनीचे मार्केटिंग प्रमुख अमित दवे, सीईओ संजीव वर्मा यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.

काय आहे प्रकरण :

टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी संबंधित एजन्सीजना हाताशी धरून कशाप्रकारे एक मोठे रॅकेट कार्यरत होते, याची तपशीलवार माहिती आयुक्तांनी दिली. यात ‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ हे तीन चॅनेल गुंतले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आली होती. मुंबईत बसवण्यात आलेल्या सुमारे २ हजार बॅरोमीटर्सचा वापर टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी केला जात असल्याचेही तपासात आढळले आहे. जे चॅनेल यात गुंतले आहेत त्यांनी आपलाच चॅनेल घरात लावून ठेवावा म्हणून घरोघरी ४०० ते ५०० रुपये वाटल्याचेही पुरावे हाती लागले आहेत. या चॅनेल्ससाठी काही जण काम करत होते. ते दर महिन्याला घरोघरी जात होते व पैसे वाटत होते, असेही स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.