- कायद्यानुसार मुलींचे नाव जाहीर न करण्याचे नियम आहेत, तरीही त्यांनी थेट वृत्तवाहिनीवरून त्याची पायमल्ली केली.
मुंबई : रेल्वे संदर्भात खोटी बातमी दिल्याच्या कारणास्तव ‘एबीपी माझा’वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना कालच अटक करण्यात आली आहे. आता मुंबईतील अजून एका नामवंत वृत्त वाहिनीच्या दोन पत्रकारांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
ज्या चैनलने १५ एप्रिल ला सकाळ पासून @Awhadspeaks यांच्या मुलीबद्दल धादांत खोटी व चुकीची बातमी चालवली गेली ज्यात ती स्पेन हून येताना कोरोना +ve असल्याचा खोटा दावा केला गेला. विशेष म्हणजे कोणत्याही कोरोना रूग्णचे नाव जाहीर न करण्याच्या आचारसंहितेची पायमल्ली केली.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 15, 2020
बांद्रे रेल्वे स्थानकाच्या बाहेर जमलेल्या मजुरांच्या गर्दीला कारणीभूत धरून एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्यात येवून त्यांना अटक करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या पत्रकारावर करण्यात आलेल्या कारवाई नंतर आता अजून नावाजलेल्या दोन पत्रकारांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काल एका वृत्तवाहिनीने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासंदर्भात एक वृ्त्त प्रसारित केले होते. गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर स्पेन वरून परतलेली त्यांची मुलगी हि कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा दावा या वाहिनीच्या बातमीत केला आहे. ज्या वृत्तवाहिनीने काल सकाळ पासून जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या मुलीबद्दल धादांत खोटी व चुकीची बातमी चालवली. त्यामध्ये त्यांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा दावा केला गेला. विशेष म्हणजे कोणत्याही कोरोना रूग्णचे नाव जाहीर न करण्याच्या आचारसंहितेची पायमल्ली त्यांनी केली होती.
कायद्यानुसार मुलींचे नाव जाहीर न करण्याचे नियम आहेत. गैर जबाबदारपणे बेछूट हेतूपुरस्सर या वृत्तवाहिनीने जे केले ते अत्यंत गंभीर आहे. देशाभरात कोरोना संसर्ग व प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण असताना घबराट पसरवणाऱ्या खोट्या बातम्या दाखवणे चुकीचे आहे. त्यामुळे या बातमीची वार्ताहर व निवेदक यांच्यावर नियमानुसार कारवाईचे आदेश दिले गेलेले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.