मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नीलम गोऱ्हे सेनेच्या उमेदवार..!



  • अद्याप भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही

| मुंबई | महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. अशातच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन नावं जाहीर करण्यात आली आहेत. या निवडणूकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख आणि पूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २१ मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे २७ मे २०२० पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणं आवश्यक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विधान परिषदेच्या या ९ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला २४ एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील ९ जागा भरण्याची विनंती केली होती.

विधान परिषदेची गणिते अशी आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीची गणितं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १०५ जागा जिंकणाऱ्या भाजपला आता विधानपरिषद निवडणुकीत तुलनेनं कमी जागांवर संधी मिळणार आहे. विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहता शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक जागा सुटू शकते. तर, भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळे महाविकासआघाडीला पाच आणि भाजपला चार जागा मिळणार असून २१ मे रोजी पार पडणारी विधानसभेची निवडणूक बिनविरोधच पार पडणार अशी चिन्ह दिसून येत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *