उध्दव ठाकरे विधानपरिषदेवर..!
मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने शिफारस..!


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस करण्यात आली. राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे एकीकडे राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा नेटाने सामना करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोणताही घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी राज्यपालांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेचे आमदार नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. संविधानाच्या कलम 164 (4) अंतर्गत उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात राज्याच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनणं अनिवार्य आहे. उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना 28 मे आधी विधीमंडळाचा सदस्य बनणं आवश्यक आहे. मात्र सध्या कोरोनाचं संकट पाहता ही विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या परिस्थितीत घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळात एकमताने घेण्यात आला. आता या शिफारशीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी निर्णय घेणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *