अखेर उद्धवनीती यशस्वी..! विधानपरिषदेची निवडणूक जाहीर..!
आमदारकीचा मार्ग मोकळा..!



| मुंबई | महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच यामुळं सुटला आहे. कारण २७ मे पूर्वी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी निवडणुका होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं होतं. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख आणि पूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २१ मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे.

निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी ११ मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर यासाठी २१ तारखेला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. २६ मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

राज्यातील विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आज झाली. या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान कोरोनाबाबतचे सगळे निर्बंध पाळण्याचं तसंच सुरक्षित निवडणूक घेण्याचं असं आयोगानं म्हटलं आहे.

विधानपरिषदेचे २४ एप्रिलला ८ सदस्य निवृत्त झाले. तर एक जागा २४ एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या ९ जागांवर निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी ३ सदस्य २४ एप्रिलला निवृत्त झाले तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी १ सदस्य निवृत्त झाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना २७ मे २०२० पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या ९ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने काल राज्यपालांनी निवडणूक आयोगाला २४ एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील ९ जागा भरण्याची विनंती केली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *