UP पोलिसांनी करून दाखवले : कुख्यात गुंड विकास दुबे पोलिसांच्या एन्काऊंटर मध्ये ठार..!

| कानपूर |आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा झाला असल्याची माहिती आहे. कानपूरमधील भौती परिसरात ही घटना घडली.

पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला दुबे पोलिसांच्या फायरिंगमध्ये गंभीर जखमी झाला होता. माहितीनुसार विकास दुबेच्या कमरेत गोळी लागली होती. एक पोलिस देखील जखमी झाला होता. दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दुबेला मृत घोषित केले.

कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला काल अटक करण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली होती. माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती, मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले होते.

गँगस्टर विकास दुबे फरार झाल्यानंतर त्याच्या साथीदारांची धरपकड केली गेली. त्याचवेळी त्याचा ‘डावा हात’ समजला जाणारा अमर दुबे याला एन्काउंटरमध्ये ठार केलं होतं. हमीरपूर येथे चकमकीदरम्यान पोलिसांच्या हातून अमर मारला गेला. तर फरीदाबाद येथून विकासच्या आणखी एका साथीदाराला पकडण्यात आले आहे.

अशी होती घटना:

कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांची ४० जणांची टीम गावात पोहोचली. त्यानंतर जे घडलं ते फक्त चित्रपटात शोभून दिसलं असतं. उत्तरप्रेदशातली कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले अशी ही घटना आहे. पोलीस पोहोचल्याचा पत्ता लागल्यावर विकास दुबे याच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलीस पुढे वाहनाऐवजी पायी गेले. याच वेळी उंच ठिकाणी बसलेल्या विकास दुबेच्या टोळीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिसांना वीरमरण आले. विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात अपराधी आहे. दुबेच्या विरोधात ५०;गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यात खून, अपहरण, खंडणी सारखी प्रकरणे आहेत. विकास दुबेनं २००१ मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती. विकास दुबेच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता मोठी टीम त्याला पकडण्यासाठी गेली होती.

कोण आहे विकास दुबे?

विकास दुबे मूळचा कानपूरजवळच्या बिकरु गावचा आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी असे किमान ६० हून अधिक गुन्हे दुबेवर दाखल आहेत.२००१ मध्ये तर पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्यानं भाजपचे राज्यमंत्री संतोष शुक्लांची हत्या केली होती.
त्या प्रकरणात एकाही पोलिसाची विकास दुबेविरोधात कोर्टात साक्ष देण्याची हिंमत झाली नाही.
बसपाच्या काळात विकास दुबेचा दबदबा वाढला. कानपूर आणि परिसरात त्याची दहशत वाढली.
याच काळात सरकारी कंत्राटापासून ते शाळा-कॉलेज उभी करुन त्यानं करोडोची संपत्ती उभी केली.
बिकरुसह आजूबाजूच्या गावांमध्ये विकास दुबेच्या परवानगीशिवाय कुणी ग्रामपंचायतीलाही उभं राहू शकत नाही. गेल्या १५ वर्षात एकदाही बिकरु गावात निवडणूक झाली नाही, शिवाय झेडपीतही दुबेच्याच कुटुंबाचा सदस्य निवडून जातो. आताही विकास दुबेची पत्नी ऋचा दुबे झेडपी सदस्य आहे. दुबेला दोन मुलं आहेत, त्यातला एक इंग्लंडमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतोय, तर दुसरा कानपूरमध्येच शिकतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *